क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हलच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. इंग्लंडने हा कसोटी सामना टी20 शैलीत जिंकला. किवी संघाने दिलेले लक्ष्य इंग्लंडने अवघ्या 12.4 षटकांत पूर्ण केले. इंग्लंडकडून जेकब बेथेलने अवघ्या 37 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. तर जो रूट 15 चेंडूत 23 धावा करून नाबाद परतला. या सामन्यात 10 विकेट्स घेणाऱ्या ब्रायडन कार्सला सामनावीराचा किताब मिळाला.
बेसबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध आपल्या अनोख्या शैलीत विजय मिळवला. पहिल्या कसोटीत इंग्लंडसमोर 104 धावांचे लक्ष्य होते. जे पाहुण्या संघाने चौथ्या दिवशी अवघ्या 12.4 षटकांत पूर्ण केले. या सामन्यात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 348 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 499 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 171 धावांची खेळी खेळली. त्यानंतर दुसऱ्या डावात किवी संघाला केवळ 254 धावा करता आल्या. अशाप्रकारे इंग्लंडला केवळ 104 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी आरामात गाठले.
न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात 93 आणि दुसऱ्या डावात 61 धावा केल्या. विल्यमसनने या सामन्यात 9000 कसोटी धावाही पूर्ण केल्या. न्यूझीलंडकडून कसोटीत 9000 धावा करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. तर इंग्लंडकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना ऍटकिन्सनने दोन बळी घेतले. तर ब्रेडन कार्सने देखील 4 बळी घेतले.
इंग्लंडकडून पहिल्या डावात हॅरी ब्रूकने 171 धावा, ओली पोपने 77 धावा आणि कर्णधार बेन स्टोक्सने निर्णायक 80 धावा केल्या. याशिवाय खालच्या क्रमवारीत 10व्या क्रमांकावर असलेल्या ब्रेडेन कार्सने नाबाद 33 आणि 9व्या क्रमांकावर असलेल्या ऍटकिन्सनने 48 धावा केल्या.
दुसऱ्या डावात किवी संघाकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर गोलंदाजीत इंग्लंडकडून कारसेने 6 आणि ख्रिस वोक्सने तीन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बेन डकेटने 18 चेंडूत 27 तर बेथलने 37 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या.
हेही वाचा-
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार! टीम इंडियाचे या ठिकाणी होणार सामने
भारताकडून झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया अस्वस्थ, दुसऱ्या कसोटीसाठी नवी योजना आखली
WTC गुणतालिकेत पुन्हा बदल, अंतिम फेरीच्या शर्यतीत हा संघ पुढे, भारत-ऑस्ट्रेलिया अडचणीत