एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताने पाच विकेट गमावून 310 धावा केल्या. कर्णधार शुबमन गिलने सलग दुसरे शतक झळकावले. तो 114 धावांवर नाबाद आहे. त्याच्यासोबत रवींद्र जडेजा 41 धावांवर खेळत आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल मैदानात उतरले. या सामन्यात राहुल फ्लॉप झाला आणि फक्त 2 धावा काढून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या करुण नायरने 31 धावांची खेळी केली. नायरने दुसऱ्या विकेटसाठी जयस्वालसोबत 80 धावांची भागीदारी केली. नायरने पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्याची संधी गमावली.
भारतीय कर्णधार शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. गिलने तिसऱ्या विकेटसाठी जयस्वालसोबत 66 धावांची भागीदारी केली. जयस्वालने शतक झळकावण्याची संधी गमावली. संघाचा स्कोअर 161 होता तेव्हा जयस्वाल तिसरा विकेट म्हणून 87 धावांवर बाद झाला.
HUNDRED in Headingley ????
— BCCI (@BCCI) July 2, 2025
HUNDRED in Edgbaston ????
Captain Shubman Gill gets his 7th Test Century ????
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/tiMIKgi0k0
जयस्वाल बाद झाल्यानंतर, गिल आणि पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. संघाचा स्कोअर 208 होता तेव्हा पंत 25 धावांवर बाद झाला. पाचव्या विकेट म्हणून नितीश कुमार रेड्डी देखील लवकरच फक्त एका धावेवर बाद झाला.
यानंतर शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनी भारतीय संघाचे कोणतेही नुकसान होऊ दिले नाही. गिलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. गिल 216 चेंडूत 12 चौकारांसह 114 धावांवर नाबाद आहे. रवींद्र जडेजा त्याच्यासोबत 67 चेंडूत पाच चौकारांसह 41 धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये 99 धावांची भागीदारी झाली आहे. जर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर दुसऱ्या दिवशीही या दोन्ही फलंदाजांना आपला डाव वाढवावा लागेल.
इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने दोन, तर ब्रायडन कार्स, बेन स्टोक्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.






