भारत आणि न्यूझीलंड १८ जूनपासून साऊथॅम्प्टनच्या मैदानावर होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडतील. इंग्लंडच्या मातीवर होणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हटले जात आहे. कारण त्या ठिकाणचे हवामान आणि खेळपट्ट्या न्यूझीलंडमधील वातावरणाशी मिळत्याजुळत्या आहेत. न्यूझीलंडमध्येही स्विंग आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या असतात, त्यामुळे या फलंदाज आणि गोलंदाजांना अशा वातावरणात खेळण्याचा अधिक अनुभव असतो.
या गोष्टी असल्या तरी भारतीय संघ विजेतेपद जिंकण्याची बरीच शक्यता आहे. न्यूझीलंडची गोलंदाजी खूप मजबूत असली तरी त्यांच्या फलंदाजीमध्ये अनुभव आणि फॉर्मचा अभाव दिसून येतो.
वेगवान गोलंदाज आहेत ताकद
ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि नील वॅग्नर या वेगवान त्रिकूटाकडे भरपूर अनुभव आहे. कायले जेमिसन न्यूझीलंडचा वेगवान माऱ्याला अधिक मजबूत बनवतो. परंतु, लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे न्यूझीलंडच्या फलंदाजीत काही कमतरता आहेत ज्याचा फायदा भारतीय गोलंदाजांना होऊ शकतो.
ही आहे न्यूझीलंडची कमजोरी
न्यूझीलंडच्या फलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास, कर्णधार केन विलियम्सन हा या संघाची सर्वात मोठी ताकद आहे. याशिवाय हेन्री निकोल्स, टॉम लॅथम, रॉस टेलर आणि बी.जे.वॉटलिंग हेदेखील या संघाचे महत्त्वाचे फलंदाज आहेत. कर्णधार विलियम्सन, वॉटलिंग आणि टेलरशिवाय न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना न्यूझीलंडबाहेर खेळण्याचा फारसा अनुभव नाही. हेन्री निकल्स इंग्लंडमध्ये कधीही कसोटी सामना खेळलेला नाही. लॅथमने इंग्लंडमध्ये केवळ २ कसोटी सामने खेळले आहेत.
वॉटलिंगने इंग्लंडमध्ये १० तर टेलरने ७ कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या दोन्ही खेळाडूंना कसोटी चॅम्पियनशिपमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. रॉस टेलरने या स्पर्धेत ३१.२६ च्या सरासरीने ४६९ धावा केल्या आहेत. तर, वॉटलिंगची सरासरी ३० पेक्षा कमी आहे. अष्टपैलू जेमिसन देखील इंग्लंडमध्ये प्रथमच कसोटी सामना खेळेल. कर्णधार केन विलियम्सनने या संपूर्ण स्पर्धेत ५८ च्या सरासरीने धावा काढल्या असल्या तरी, परदेशी भूमीवर फक्त ११.५७ च्या सरासरीने ७ डावांमध्ये ८७ धावा त्याला करता आल्या आहेत.
न्यूझीलंडला या बहुप्रतीक्षित अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. यामुळे त्यांच्या फलंदाजांना तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्याची चांगली संधी असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“गाबा कसोटीत पुजारा ऑस्ट्रेलियन फलंदाजाप्रमाणे खेळला,” ऑसी सलामीवीराचे मोठे भाष्य
जेव्हा एकाच वेळी खेळले होते भारताचे दोन वेगवेगळे संघ, ‘अशी’ झाली होती गत; वाचा सविस्तर
भारतीय खेळाडूने ‘केरळ एक्सप्रेस’ श्रीसंतची कपिल देव आणि मोहम्मद शमीशी केली तुलना, पण का?