भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. बुधवारी (१७ ऑक्टोबर) भारताचा नवा टी-२० कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १६४ धावा केल्या. भारतीय संघाने पाच गडी राखून सामना सहज जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने विश्वचषकाच्या पराभवाचा आणि ‘एका’ महत्वाच्या विक्रमाचा देखील ‘हिशोब बरोबर’ केला आहे.
या विजयापूर्वी टी२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंड असा एकमेव संघ होता, ज्यांच्याविरुद्ध भारताने विजयापेक्षा जास्त सामने हारले होते. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध या सामन्याआधी १७ सामने खेळले होते. त्यात भारतीय संघाने ८ विजय मिळवले होते. आता या सामन्यांनंतर आकडेवारी बरोबरीत आली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध १८ सामन्यात ९ विजय प्राप्त केले आहेत आणि ९ सामने गमावले आहेत.
त्यातही टी२० विश्वचषकात भारताला न्यूझीलंडविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाहीये. भारताने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध खेळलेले टी२० विश्वचषकातील तिनही सामने गमावले आहेत. यात टी२० विश्वचषक २०२१ मधील न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्याचाही समावेश आहे. परंतु भारतीय संघाच्या या एका विजयाने आता टी२०तील महत्त्वाच्या विक्रमाचा हिशोब बरोबर झाला आहे, असे म्हणता येईल.
तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले होते. न्यूझीलंड संघाने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १६४ धावा केल्या आणि भारताला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिलने सर्वाधिक ७० धावा केल्या तर मार्क चॅपमनने ६३ धावांचे योगदान दिले. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी २-२ तर दीपक चहर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावा केल्या. त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. रोहितने ४८ धावांचे योगदान दिले. डॅरिल मिशेलच्या डावातील शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रिषभ पंतने चौकार मारून भारताला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. तो १७ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १७ धावा करून नाबाद परतला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्डने ३१ धावांत २ बळी घेतले, तर टीम साऊदी, मिचेल सँटनर आणि डॅरिल मिशेलने १-१ बळी घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
एकवेळी ४ वर्षे टी२० संघातून बाहेर राहिलेल्या अश्विनचे न्यूझीलंडविरुद्ध विशेष ‘अर्धशतक’