Loading...

“आता कोणीही म्हणू शकत नाही की आम्ही कमजोर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळलो”

बंगळुरु। भारताने रविवारी(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सने पराभूत केले. त्याचबरोबर 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

या मालिकेतील मुंबईत झालेला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने दबरदस्त पुनरागमन करत पुढील दोन्ही सामने जिंकले आणि मालिकाही जिंकली.

या मालिका विजयानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले की ‘कोणीही म्हणू शकणार नाही की आम्ही कमजोर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळलो.’

मागीलवर्षी जानेवारीमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात 2-1 अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केले होते. भारताने त्यावेळी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

मात्र त्यावेळी डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथवर चेंडू छेडछाड प्रकरणी बंदी असल्याने त्यांचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश नव्हता. त्यामुळे अनेकांचे मत होत की भारताने कमजोर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध विजय मिळवला आहे.

Loading...

याच टीकांवर उत्तर देताना रविवारी झालेल्या वनडे सामन्यानंतर शास्त्री म्हणाले, ‘या संघाने (भारतीय संघाने) शानदार कामगिरी केली आहे. आता कोणीही म्हणू शकत नाही की आम्ही कमजोर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळलो. मुंबईत पराभूत झाल्यानंतर पुढील दोन्ही सामने जिंकले, आणि या प्रवासादरम्यान ऑस्ट्रेलियाने तिन्ही नाणेफक जिंकले होते. ही चांगली कामगिरी आहे.’

या वनडे मालिकेत स्मिथ आणि वॉर्नर दोघेही ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होते.

त्याचबरोबर शास्त्री यांनी मधल्या फळीतील विकेट्स महत्त्वाच्या ठरल्या असेही म्हटले आहे. तसेच त्यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या फलंदाजीचेही कौतुक केले. तसेच म्हटले आता यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 287 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने 119 धावांची शतकी खेळी केली. तर विराटने 89 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच अखेरीत आक्रमक खेळताना अय्यरने नाबाद 44 धावा केल्या.

त्यामुळे भारताने 287 धावांचे आव्हान 47.3 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने 131 धावांची शतकी खेळी केली होती. तर मार्नस लॅब्यूशेनने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 9 बाद 286 धावा केल्या होत्या.

Loading...
You might also like
Loading...