हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) च्या मॅचविक 14 मध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेडचा संघ शुक्रवारी (6 जानेवारी) गुवाहाटी येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर बंगळुरू एफसीचा पाहुणचार करणार आहे. दोन्ही संघांना यंदाच्या पर्वात काही खास कामगिरी करता आलेली नाही. नॉर्थ ईस्ट युनायटेडचा संघ एका विजयासह तालिकेत तळावर आहे, तर बंगळुरू एफसी 10 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
मुख्य प्रशिक्षक व्हिन्सेंझो ॲन्नेसे यांच्या येण्याने नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीच्या खेळात बदल पाहायला मिळाला. नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थ ईस्टने चार सामने खेळले, परंतु त्यापैकी दोन सामन्यांत त्यांना लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. एका सामन्यात चेन्नईयन एफसीने 7-3 असे, तर दुसऱ्या सामन्यात हैदराबाद एफसीने 6-1 अशा फरकाने त्यांना पराभूत केले. पण, त्याचवेळी नॉर्थ ईस्टने यंदाच्या पर्वात एटीके मोहन बागानला पराभूत करून पहिल्या विजयाची चवही चाखली आहे. या विजयाने त्यांनी प्रथमच तळाच्या स्थानावरून वर सरकण्याची किमया केली होती.
नॉर्थ ईस्ट युनायटेडने या आठवड्यात फ्री टान्सफर विंडोतून हिरा मोंडल याला करारबद्ध केले आहे, तो आधी बंगळुरू एफसीचा सदस्य होता. हिरा मोंडल उद्याच्या सामन्यात माजी संघाविरुद्ध पदार्पण करण्याची शक्यता आहे. नॉर्थ ईस्टला बचाव व आक्रमण याचा योग्य ताळमेळ राखायचा आहे आणि त्यादृष्टीने ते बदल करू शकतात. सामन्यापूर्वी प्रशिक्षक ॲन्नेसे हे त्यांच्या आगमनानंतर तीन सामन्यांमध्ये संघाने पहिल्या विजयाची नोंद करूनही आणि गोल करूनही ते समाधानी नाही.
”मी तीन सामने गमावले आणि एक सामना जिंकला आहे. या कामगिरीवर मी समाधानी नक्कीच नाही. माझ्यासाठी खेळाडूंनी सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. आम्ही तसा सराव केला आहे. खेळाडूंना चेंडूवर ताबा राखता येत नसल्याचे मला ज जाणवले, परंतु पूर्वीच्या कामगिरीपेक्षा आम्ही आता एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्या प्रकारे आम्ही सराव केलाय, ते पाहून मी आनंदी आहे,” असे ॲन्नेसे म्हणाले.
Closing in on our first #HeroISL fixture of 2023, as we prepare for #NEUBFC ⚔️#WeAreBFC #NothingLikeIt 🔥 pic.twitter.com/y6P67kngTb
— Bengaluru FC (@bengalurufc) January 4, 2023
नॉर्थ ईस्ट प्रमाणे बंगळुरू एफसीनेही बचावात निराश केले आहे. या पर्वात त्यांच्याविरुद्ध 17 गोल झाले आहेत आणि केवळ 8 गोल त्यांना करता आलेले आहेत. अन्य संघांनी त्यांच्यापेक्षा जास्तच गोल केले आहेत. आयएसएल इतिहासातील दोन सर्वाधिक गोल करणारे खेळाडू संघात असूनही अशी अवस्था झाल्याने बंगळुरूची चिंता खरी वाढली आहे. सुनील छेत्री आणि रॉय कृष्णा हे आयएसएल इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल चौघांत आहे. पण, या पर्वात त्यांना 11 सामन्यांत केवळ एक गोल करता आला आहे.
बंगळुरू एफसीचे मुख्य प्रशिक्षक सिमॉन ग्रेसन यांनी यंदाच्या पर्वात नशीबाने साथ दिली नसल्याचे म्हटले आहे. ”ही कामगिरी खरोखर कठीण आणि निराशाजनक आहे. या गोष्टी आपण प्रत्येक पत्रकार परिषदेत सांगत असतो. आम्ही कमी-अधिक प्रमाणात तेच म्हणत आहोत. आम्ही एक चांगला संघ होण्याच्या आणि विजयी मिळवण्याच्या खूप जवळ होतो, परंतु आम्हाला तसे करता आले नाही,”असे ते म्हणाले.
बंगळुरू एफसीने हिरो आयएसएलमध्ये 13 सामन्यांपैकी नॉर्थ ईस्टविरुद्ध 7 मध्ये विजय मिळवला आहे, तर केवळ दोन पराभव पत्करले आहेत. चार सामने अनिर्णित राहिले आहे. मागील सामन्यात ॲलन कोस्टाच्या गोलवर बंगळुरूने 1-0 असा विजय मिळवला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: क्रिकेटर साईराज बहुतुले
…आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल