गोवा। हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात बाद फेरीची शर्यत फेरीगणिक रंगतदार ठरत आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने मंगळवारी(26 जानेवारी) एटीके मोहन बागानला 2-1 असा धक्का दिला. याबरोबरच नॉर्थईस्ट युनायटेडने पाचव्या क्रमांक गाठला आहे.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीची कोंडी होती. नॉर्थईस्ट युनायटेडला आघाडी फळीतील पोर्तुगालचा 28 वर्षीय खेळाडू लुईस मॅचादो याने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एटीकेएमबीचा कर्णधार रॉय कृष्णा या फिजीच्या खेळाडूने 72व्या मिनिटाला संघाला बरोबरी साधून दिली. नॉर्थईस्ट युनायटेडचा दुसरा गोल नऊ मिनिटे बाकी असताना मध्य फळीतील ऊरुग्वेचा खेळाडू फेडेरीको गॅलेगो याने केला. बदली मध्यरक्षक रोछार्झेला याच्या पासवर त्याने उजव्या पायने नेटच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू मारताना एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याला चकविले. हा गोल निर्णायक ठरला.
नॉर्थईस्टने 13 सामन्यांत चौथा विजय मिळविला असून सहा बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १८ गुण झाले. त्यांनी चौथ्या क्रमांकावरील हैदराबाद एफसीला गुणांवर गाठले, पण हैदराबादचा 2 (16-14) गोलफरक नॉर्थईस्ट युनायटेडच्या 0 (17-17) पेक्षा सरस आहे.
बाद फेरीतील अखेरच्या चौथ्या स्थानासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. चेन्नईयीन एफसी 16 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बेंगळुरू एफसी, जमशेदपूर एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी या तिन्ही संघांचे प्रत्येकी 14 गुण आहेत.
एटीकेएमबीचा दुसरा क्रमांक कायम राहिला. 13 सामन्यांत त्यांना तिसरा पराभव पत्करावा लागला असून 7 विजय व 3 बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 24 गुण कायम राहिले आहेत. आघाडीवरील मुंबई सिटी एफसीविरुद्धची पिछाडी कमी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना या पराभवामुळे धक्का बसला.
मुंबई सिटी 13 सामन्यांतून 30 गुण मिळवून आघाडीवर आहे. मुंबई सिटीकडे सहा गुणांची आघाडी आहे. एफसी गोवा 13 सामन्यांतून 20 गुणांसह तिसऱ्या, तर हैदराबाद एफसी 13 सामन्यांतून 18 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
सामन्यातील पहिल्या गोलची प्रतिक्षा तासाभराच्या खेळात संपली. 60व्या मिनिटाला मध्य फळीतील फेडेरीको गॅलेगो याने रचलेल्या चालीवर मॅचादोने बॉक्सच्या मध्य भागातून उजव्या पायाने फिनिशींग करीत नेटच्या डाव्या कोपऱ्यात तळात चेंडू मारला.
72व्या मिनिटाला मध्यरक्षक कार्ल मॅकह्यूज याने रचलेल्या चालीवर कृष्णाने डाव्या पायाने ताकदवान फटका मारत नेटच्या डाव्या कोपऱ्यात चेंडू घालविला.
कृष्णाने पहिल्या सहा सामन्यांत पाच गोल केले होते. त्यानंतर मात्र त्याला एकच गोल करता आला होता. चेन्नईयीनविरुद्धच्या लढतीपूर्वी त्याच्या फॉर्मबाबत चिंता वाटत नसल्याचे एटीकेएमबीचे प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांनी शांतपणे सांगितले होते. कृष्णाने या गोलद्वारे प्रशिक्षक, संघातील सहकाऱ्यांसह चाहत्यांचाही विश्वास सार्थ ठरविला.
सामन्याची सुरुवात चुरशीने झाली. दुसऱ्याच मिनिटाला एटीकेएमबीचा स्ट्रायकर डेव्हिड विल्यम्स याने नॉर्थईस्ट युनायटेडचा मध्यरक्षक लालेंगमाविया याला चकवून मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. आगेकूच करून सहकाऱ्याला पास देण्याचा त्याचा प्रयत्न मात्र फसला.
आठव्या मिनिटाला एटीकेएमबीचा कर्णधार रॉय कृष्णा याने नॉर्थईस्ट युनायटेडचा बचावपटू माशूर शेरीफ याला चकवून चेंडू ताब्यात घेत डावीकडून बॉक्समध्ये मुसंडी मारली. त्याने मध्यरक्षक जेव्हीयर हर्नांडेझ याच्या दिशेने फटका मारला. हर्नांडेझने टायमिंग साधत धाव घेतली, पण फिनिशींगमध्ये तो कसलीही अचूकता साधू शकला नाही.
सामन्याच्या 20व्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडचा मध्यरक्षक फेडेरीको गॅलेगो याने चेंडूवर ताबा मिळवित मध्य क्षेत्रातून आगेकूच केली. त्याने मारलेला फटका एटीकेएमबीचा बचावपटू संदेश झिंगन याने बाहेर घालविला. त्यामुळे नॉर्थईस्ट युनायटेडला कॉर्नर मिळाला. त्यावर शेरीफने प्रयत्न केला, पण दोन प्रयत्नांतही तो फिनिशींग करू शकला नाही.
32व्या मिनिटाला गऍलेगोने डावीकडून चाल रचत मॅचादोला पास दिला. मॅचादोचा फटका भट्टाचार्य याने उजवीकडे झेपावत अडविला. 36व्या मिनिटाला एटीकेएमबीचा डेव्हिड विल्यम्स कॉर्नरच्या संधीचा फायदा उठवू शकला नाही.