लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडवर 151 धावांनी मोठा विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघ तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी हेडिंग्ले (लीड्स) येथे पोहोचला आहे. तिथे भारतीय संघाने सरावही सुरू केला आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे आणि विराट कोहलीचा संघ पुढील सामन्यातही विजय नोंदवण्यासाठी उत्सुक आहे.
एकीकडे भारतीय संघ खूप मजबूत दिसत असताना, इंग्लंड संघ पूर्णपणे त्यांचा कर्णधार जो रूटच्या भरवश्यावर आहे. भारतीय संघ सर्व बाबतीत इंग्लंडपेक्षा वरचढ दिसत असला तरी एक गोष्ट संघाच्या बाजूने नाही, ती म्हणजे सध्याच्या संघातील कोणत्याही खेळाडूला हेडिंग्लेमध्ये खेळण्याचा अनुभव नाही.
सध्या भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. या खेळाडूंना हेडिंग्ले येथे एकही कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही. हेडिंग्ले येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 19 वर्षांपूर्वी 2002 मध्ये खेळला गेला होता.
त्यावेळी सध्याच्या संघातील एकही खेळाडू भारतीय संघाचा भाग नव्हता. याचाच अर्थ, भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू हेडिंग्लेवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनची अत्यंत काळजीपूर्वक निवड करावी लागेल. तसेच त्याच्या कामगिरीवर पूर्ण लक्ष द्यावे लागेल.
हेडिंग्लेबद्दल भारताचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज फारूक इंजिनीअर म्हणतात की, “जर खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य राहिली, तर संघाचा विजय बऱ्याच अंशी भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.”
तसे, हेडिंग्ले येथे 2002 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी विजयात मोठी भूमिका बजावली होती. अनिल कुंबळेने त्या कसोटी सामन्यात एकूण 7 बळी मिळवले होते. तर हरभजननेही चार विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय फलंदाजांनीही चांगल्या धावा केल्या होत्या. यावेळच्या सामन्यासाठी भारतीय संघ रविंद्र जडेजासोबत मैदानात उतरतो की आर अश्विनसोबत? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘परफ्यूम बाॅल’ नक्की आहे तरी काय? ज्याने नेपाळचा गोलंदाज गुलशन झाचे पालटले नशीब
एका बाऊन्सरने नेपाळच्या ‘या’ गोलंदाजाला आणलं प्रकाशझोतात, थेट राष्ट्रीय संघात झाली निवड
पाकिस्तानी फलंदाजाचे विंडीजविरुद्ध झंझावती शतक; गावसकर, गांगुलीसारख्या दिग्गजांवर ठरला वरचढ