पॅरीस। फ्रेंच ओपन २०२१ स्पर्धेत शुक्रवारी(११ जून) पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीतील सामने पार पडले. या फेरीतील दुसरा सामना सार्बियाच्या नोवाक जोकोविच विरुद्ध स्पेनच्या राफेल नदाल यांच्यात झाला. या सामन्यात अव्वल मानांकित जोकोविचने १३ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदालचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
‘लाल मातीचा बादशाहा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदालचा हा फ्रेंच ओपन स्पर्धेतील केवळ तिसरा पराभव आहे. त्याने या स्पर्धेत १०८ सामने खेळले असून १०५ सामने जिंकले आहेत. तसेच नदालला फ्रेच ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत करणारा जोकोविच हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
शुक्रवारी पार पडलेल्या उपांत्य सामन्यात जोकोविच आणि दुसऱ्या मानांकित नदालमध्ये ४ तास २२ मिनिटांची लढत झाली. या लढतीत जोकोविचने ३-६, ६-३, ७-६ (४), ६-२ अशा फरकाने चार सेटमध्ये नदालचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना गाठला. मागीलवर्षी या दोघांमध्ये फ्रेंच ओपनचा अंतिम सामना पार पडला होता. त्यात नदालने बाजी मारत १३ व्यांदा फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरले होते.
Impossible Achieved 👊@DjokerNole becomes the first player in history to defeat Nadal in a Paris semi-final, besting the Spaniard 3-6, 6-3, 7-6(4), 6-2 to reach the title match.#RolandGarros pic.twitter.com/Cfy4178lSW
— Roland-Garros (@rolandgarros) June 11, 2021
शुक्रवारी झालेल्या सामन्यात नदालने सुरुवात झकास केली होती. त्याने पहिल्या सेटमधील पहिले ५ गेम जिंकत आघाडी मिळवली होती. हा सेट तो सहज जिंकेल असं वाटत असतानाच जोकोविचने आपल्या खेळाचा स्तर उंचावत नेला. पण नदालने पहिला सेट ६-३ अशा फरकाने जिंकत आघाडी मिळवली. मात्र, त्यानंतर लयीत आलेल्या जोकोविचने दुसरा सेट सहज जिंकत बरोबरी साधली.
या दोघांमध्ये झालेला तिसरा सेट सर्वात अटीतटीचा झाला. तब्बल ९३ मिनिटे चाललेल्या या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपले सर्वस्व झोकून दिले होते. या सेटमध्ये तब्बल ४ सर्विस ब्रेक आणि १४ ब्रेक पाँइंट्स पाहायला मिळाले. हा सेट ६-६ च्या बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये गेला होता. त्यात जोकोविचने बाजी मारत सामन्यात आघाडी मिळवली. या आघाडीचा फायदा घेत त्याने चौथ्या सेटमध्येही नदालवर वर्चस्व ठेवले आणि हा सेट ६-२ असा जिंकत सामनाही खिशात घातला.
9️⃣3️⃣ minute set 🤯#RolandGarros pic.twitter.com/ltafs4vNHx
— Roland-Garros (@rolandgarros) June 11, 2021
या सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, ‘पॅरीसमध्ये मी खेळलेला हा सर्वात सुंदर सामना होता, यात शंका नाही.’
रविवारी(१३ जून) होणारा अंतिम सामना हा जोकोविचचा ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या पुरुष एकेरी गटातील २९ वा अंतिम सामना असणार आहे. तो ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या पुरुष एकेरी गटात सर्वाधिक अंतिम सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नदालला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. नदालने २८ वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धांचे एकेरी गटात अंतिम सामने खेळले आहेत. तर या यादीत ३१ अंतिम सामन्यांसह स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आहे.
Most Grand Slam men's singles finals (all-time)
🇨🇭 Federer – 31
🇷🇸 Djokovic – 29
🇪🇸 Nadal – 28#RolandGarros— ATP Tour (@atptour) June 11, 2021
रविवारी जोकोविचला फ्रेंच ओपन २०२१ च्या अंतिम सामन्यात २२ वर्षीय ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपासचे आव्हान असणार आहे. त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेवला पराभूत करत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
– फ्रेंच ओपन: ग्रीसच्या त्सित्सिपासने घडवला इतिहास; पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये केला प्रवेश