भारताने शुक्रवारी (दि. 14 जुलै) आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साठी संघाची घोषणा केली आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली असून, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड या संघाचे नेतृत्व करेल. या संघात एकाही अनुभवी खेळाडूला समाविष्ट केले गेले नाही. अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेला अनुभवी सलामीवीर शिखर धवन स्पर्धेसाठी कर्णधार असेल असे सांगितले जात होते. मात्र, त्याला संघात आपली जागा बनवण्यात देखील यश आले नाही. त्यामुळे आता त्याच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची समाप्ती झाली का असा प्रश्न विचारला जातोय.
आशियाई स्पर्धा साठी भारतीय संघ जाणार हे जाहीर झाल्यानंतर अनेक जण शिखर या संघाचा कर्णधार होईल असे सांगत होते. मात्र, बीसीसीआय व संघ व्यवस्थापनाने भविष्याचा विचार करत ऋतुराजकडे नेतृत्व दिले. या संघात सलामीवीर म्हणून ऋतुराजसह नुकतेच आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला यशस्वी जयस्वाल व पंजाबचा युवा यष्टीरक्षक प्रभसिमरन गिल हे दिसतील. अशात शिखर धवन याच्यासाठी भारतीय संघात पदार्पण करणे कठीण जाईल असे बोलले जाते.
सध्या भारतीय संघात रोहित शर्मा व शुबमन गिल हे सलामीवीराची भूमिका पार पाडतात. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्याच डावात शतक करून पुढील काही काळासाठी तरी आपली जागा निश्चित केली आहे. त्यामुळे 38 वर्षांच्या शिखरला आता पुन्हा एकदा संधी मिळणे अशक्य असल्याचे दिसते.
शिखरने आपल्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी 34 कसोटी, 167 वनडे व 68 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या बॅटमधून दहा हजार पेक्षा जास्त धावा निघाल्या असून, आयसीसी स्पर्धांमध्ये तो सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसलेला. तसेच मागील काही मालिकांमध्ये त्याने भारतीय संघाचे नेतृत्व देखील केलेले.
त्याला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली. भारतीय क्रिकेटच्या एका सेवकाला आणखी संधी द्यायला हवी होती असे मत काहींनी व्यक्त केले.
(Now Shikhar Dhawan International Career Almost Finish After Not Selected For Asian Games)
महत्वाच्या बातम्या –
Asian Games 2023 । भारतीय संघाची घोषणा, ‘असे’ आहे हरमनप्रीतच्या नेतृत्वातील स्क्वॉड
भारतीय संघात निवड होताच रिंकूची मोठी प्रतिक्रिया, फक्त एकाच शब्दात झाला व्यक्त