केरळा ब्लास्टर्सच्या घरच्या मैदानावरील सामना हा फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणीचाच असतो. काहीही झालं तरी अखेरपर्यंत आपल्या संघाच्या मागे उभे राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंचीही तितकीच सुरेख साथ मिळते आणि सोमवारीही (26 डिसेंबर) तसेच झाले. हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल ) च्या आजच्या सामन्यात 85व्या मिनिटापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता अन् 86व्या मिनिटाला ओडिशा एफसीचा गोलरक्षक अमरिंदर सिंगकडून चूक झाली. केरळा ब्लास्टर्सच्या संदीप सिंगने संधी साधून हेडरद्वारे गोल केला आणि स्टेडियम चाहत्यांच्या जयघोषाने दणाणून निघाले. केरळा ब्लास्टर्सने 1-0 असा विजय मिळवून तालिकेत 22 गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली.
हिरो आयएसएलमध्ये उभय संघ आजच्या लढतीपूर्वी 19 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले. दोघांनी प्रत्येकी सहा विजय मिळवले आहेत आणि 7 सामने ड्रॉ राहिले आहेत. पण, ओडिशाला केव्हाच केरळाला त्यांच्या घरी पराभूत करता आलेले नाही. पण, यंदाच्या पर्वात ओडिशा एफसीची कामगिरी ही भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना चिंतेत टाकणारी नक्की आहे. तिसऱ्या मिनिटाला रेनिएर फर्नांडेसने यजमान केरळाच्या बचावपटूंना गोंधळून टाकले. फर्नांडेसने मारलेला चेंडू पोस्टला लागून माघारी परतला अन् त्याचवेळेस नंदाकुमार सेकरकडे तो आला. त्याचा प्रयत्न गोल जाळीच्या वरून गेला, परंतु हे प्रयत्न केरळाच्या बचावफळीला विचार करायला लावणारे नक्की ठरले. 24व्या मिनिटाला कार्लोस डेल्गाडोने ऑन टार्गेट प्रयत्न केरळाचा गोलरक्षक प्रभसुखन गिलने सहज अडवला. पण, गिलकडून चूक झाली अन् रेफरीने त्याला पिवळे कार्ड दाखवले.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांच्या बचावपटूंचा खेळ बहारदार झाला. यजमान केरळा ब्लास्टर्स दडपणाखाली खेळताना दिसले. 45 मिनिटांच्या या खेळात ओडिशाचे पारडे जड राहिले. दोन्ही संघांना गोल करता मात्र आले नाही. दुसऱ्या हाफमध्ये सहल अब्दुल समदने पहिल्याच मिनिटाला चेंडू पेनल्टी क्षेत्रात नेला, परंतु अंतिम टच देण्यात तो चुकला. राहुल केपी आणि समद यांचा खेळ पाहून केरळाचे फॅन्सही आनंदात दिसले आणि स्टेडियमवर जोरदार समर्थन सुरू झाले. एड्रीयन लुनानेही समद व राहुल केपी यांना चांगली साथ दिली. पण, आक्रमक झालेल्या केरळाला रोखण्यासाठी ओडिशाने त्यांची बचावफळीही भक्कम केली. 57व्या मिनिटाला लुनाच्या पासवर दिमित्रिओस डिएमांटाकोसला गोल करण्याची संधी होती, परंतु सहा यार्डवर कार्लोस डेल्गाडोने अचूक बचाव केला.
दिमित्रिओसने 66व्या मिनिटाला केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. 71व्या मिनिटाला सहलने निहाल सुदीशच्या दिशेने सुरेख पास दिला अन् निहालला केवळ गोलरक्षक अमरिंदर सिंगला चकवायचे होते. पण, निहालचा चेंडूशी संपर्क होऊ शकला नाही अन् अमरिंदरने पुढे येऊन तो चेंडू रोखला. 75व्या मिनिटाला लुनाने बायसिकल किकद्वारे गोल करण्याचा प्रयत्न पाहून केरळाचे चाहते जोशात आले. 80व्या मिनिटापर्यंत केरळाच्या पाच खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवण्यात आले होते. 79व्या मिनिटाला अमरिंदर त्याची जागा सोडून पुढे आला, पण चेंडूवर त्याला ताबा राखता आला नाही. नशीबाने नरेंद्र गेहलोतने चेंडू दूर केला अन् केरळाचा गोल होऊ दिला नाही. अमरिंदरने त्यानंतर सहकाऱ्यांची माफी मागितली. केरळाकडून सातत्याने आक्रमणाचे प्रयत्न झाले अन् कोचीतील स्टेडियमवर जयजयकार झाला.
വിജയകുതിപ്പ് തുടർന്നു കൊണ്ട് 💛😎#KBFCOFC #ഒന്നായിപോരാടാം #KBFC #KeralaBlasters pic.twitter.com/TtrjUa4Qz3
— Kerala Blasters FC (@KeralaBlasters) December 26, 2022
83व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर लुनाने रणनीती बदलून चेंडू जेसल कार्नेईरोकडे दिला अन् त्याने टोलावलेला चेंडू पोस्टला लागून माघारी फिरला. त्यावर मार्को लेस्कोव्हिचला गोल करता आला असता, परंतु त्याने सामन्याती सर्वात सोपी संधी गमावली. केरळाचे चाहते नाराज झाले, परंतु त्यांना अजूनही खेळाडूंकडून अपेक्षा होती. 86व्या मिनिटाला त्यांची ही अपेक्षा पूर्ण झाली. ओडिशाचा गोलरक्षक अमरिंदर पुन्हा चूकला अन् यावेळी सोराईशाम संदीप सिंगने हेडरद्वारे गोल करून यजमानांना 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. कोची स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. 90+2 मिनिटाला निहालचा ऑन टार्गेट प्रयत्न अमरिंदरने रोखला. केरळा ब्लास्टर्सने हा सामना 1-0 असा जिंकला.
निकाल : केरळा ब्लास्टर्स एफसी 1 (सोराईशाम संदीप सिंग 86 मि. ) विजयी वि. ओडिशा एफसी 0.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट
अखेर पंतला दाखवला गेला बाहेरचा रस्ता! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमधून मिळाला डच्चू