आयपीएलच्या या हंगामात कोलकाता नाईटरायडर्सकडून खेळत असलेला युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने लोकडाऊनमध्ये मैदानात खूप घाम गाळला अशी माहिती त्याचे वडील पंकज मावी यांनी दिली. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रशिक्षक फुलचंद शर्मा आणि चेन्नईचा स्टार फलंदाज सुरेश रैना यांनी त्याच्याकडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्ण तयारी करवून घेतली असेही त्यांनी सांगितले.
दुखापतीनंतर पुनरागमन करणे होते कठीण
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार पंकज मावी म्हणाले, “लॉकडाउनमध्ये केलेली मेहनत शिवमसाठी खरोखर उपयुक्त ठरत आहे. त्याने घरी एक व्यायामशाळा उभारली होती. तो त्याच्या शरीरावर दररोज दोन ते तीन तास काम करायचा. या काळात त्याने आपले वजन दोन ते तीन किलो कमी केले होते. दुखापतीनंतर पुनरागमन करणे कठीण होते. तो वेगवान गोलंदाज आहे याची मला जाणीव होती आणि वेगवान गोलंदाजांना अशा दुखापती सहन कराव्या लागतात. होय, लॉकडाऊन दरम्यान त्याला अधिक तंदरुस्त होण्याची संधी मिळाली.”
जसप्रीत बुमराहशी साधतो संवाद
“शिवम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला आपला आदर्श मानतो. तो त्याच्याशी नेहमी संवाद साधतो. बुमराहने शिवमला प्रोत्साहित करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. लॉकडाउन संपल्यानंतर शिवमने राजनगर येथील सुरेश रैना क्रिकेट अकादमीकडे जाण्यास सुरवात केली, तो 19 वर्षाखालील क्रिकेट संघात खेळत होता तेव्हापासून रैना शिवमची खास काळजी घेत आहे. त्याने एका गुरूप्रमाणे शिवमला प्रशिक्षण दिले आहे” असेही पंकज मावी यांनी सांगितले
सौरव गांगुलीही झाले होते प्रभावित
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली शिवमच्या गोलंदाजीने प्रभावित झाले आहे. ते शिवमला नेहमी प्रोत्साहन देतात. 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकल्यानंतर गांगुलीने एकदा शिवमला बंगालच्या रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचे आमंत्रण दिले होते.