पुणे ।ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या अकराव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात यशराज दळवी, दक्ष अगरवाल यांनी तर मुलींच्या गटात वैष्णवी आडकर व बेला ताम्हणकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत एकेरीत मुलांच्या गटात पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या यशराज दळवीने अव्वल मानांकित भूपेंदर दहियाचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. हा सामना 1 तास चालला. सामन्यात यशराजने पहिल्या सेटमध्ये जोरदार खेळ करत भूपेंदरची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली.
या सेटमध्ये आपले वर्चस्व राखत यशराजने तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-1 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला आपापल्या सर्व्हिस राखल्या व सामन्यात 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर यशराजने वरचढ खेळ करत सहाव्या व आठव्या सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बिगरमानांकीत दक्ष अगरवाल याने आठव्या मानांकित संदेश कुरळेचा 5-7, 7-5, 6-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलांच्या गटात सिद्धार्थ मराठे व अंशुल सातव यांनी कुश अरजेरिया व सिद्धार्थ जडली यांचा 6-3, 1-6, 10-6 असा तर, दुसऱ्या लढतीत जितीन छेत्री व भूपेंदर दहिया यांनी प्रसाद इंगळे व रोहन फुले या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलींच्या गटात एकेरीत उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर हिने अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेचा 1-6, 6-4, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तिसऱ्या मानांकित बेला ताम्हणकर हिने खेलो इंडिया गोल्ड मेडलिस्ट दुसऱ्या मानांकित प्रेरणा विचारेवर टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(6) असा सनसनाटी विजय मिळवत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-उपांत्य फेरी- मुले:
यशराज दळवी(5)वि.वि.भूपेंदर दहिया(1) 6-1, 6-2;
दक्ष अगरवाल वि.वि.संदेश कुरळे(8) 5-7, 7-5, 6-0;
मुली:
वैष्णवी आडकर(4)वि.वि.आकांक्षा नित्तुरे(1)1-6, 6-4, 6-3;
बेला ताम्हणकर(3)वि.वि.प्रेरणा विचारे(2)6-3, 7-6(6);
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
सिद्धार्थ मराठे/अंशुल सातव वि.वि.कुश अरजेरिया/सिद्धार्थ जडली6-3, 1-6, 10-6;
जितीन छेत्री/भूपेंदर दहिया(2) वि.वि.प्रसाद इंगळे/रोहन फुले(4) 7-5, 6-3;
मुली:
बेला ताम्हणकर/प्रेरणा विचारे(1)वि.वि.रुमा गाईकवारी/मधुरिमा सावंत 6-3, 6-3;
राधिका महाजन/वैष्णवी आडकर(3)वि.वि.आकांक्षा नित्तूरे/हर्षिता बांगेरा(3) 6-3, 6-0.