संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष सध्या आगामी टी२० विश्वचषक २०२१ वर आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी बऱ्याचशा क्रिकेट संघांमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. अशात सर्वत्र चर्चा रंगली होती की, टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मर्यादित षटकांच्या स्वरुपातून राजीनामा देईल आणि उपकर्णधार रोहित शर्मा याच्या हाती या संघांच्या नेतृत्त्वाची सूत्रे येतील. मात्र पुढे या केवळ अफवा असल्याचे समजले. आता याच प्रकरणी भारताचे माजी क्रिकेटपटू रितींदर सिंग सोढी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोहलीची नेतृत्त्वातील कामगिरी पाहता त्याला या पदावरुन सहजासहज हटवता येणार नाही. तो एकटाच असा व्यक्ती आहे, जो त्याला नेतृत्त्वपद सोडायचे की नाही? निर्णय घेऊ शकतो, असे सोढी यांचे म्हणणे आहे.
‘इंडिया न्यूज’शी बोलताना सोढी म्हणाले की, “कोहलीची कामगिरी सर्वांना परिचित आहे. त्याची कामगिरीच या गोष्टीची ग्वाही देते. तो सध्याच्या काळातील असा कर्णधार आहे, जो स्वत: नेतृत्त्वाच्या जबाबदारीतून निवृत्ती घेत नाही; तोपर्यंत संघाचा कर्णधार बनून राहू शकतो.”
“जेव्हा तुम्ही सुपरस्टार असता, तेव्हा तुमच्या चाहत्यांच्या संख्येबरोबरच टिकाकारांचीही संख्या वाढत जात असते. टिकाकारांचे काम टीका करणे असते. मग तुम्ही चांगले प्रदर्शन करा अथवा वाईट, ते नेहमी तुम्हाला वाईटच म्हणत असतात,” अशा शब्दांत त्यांनी कोहलीच्या टिकाकारांनाही टोला लगावला आहे.
दरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे की, कोहली कर्णधापद सोडण्याचे वृत्त एक अफवा आहे, तसेच सध्या संघाला कसोटी आणि मर्यादीत षटकांसाठी, असे दोन कर्णधार नेमण्याचा कोणताही विचार नाही.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह म्हणाले, “आम्ही असा कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही आणि विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ योग्यप्रकारे पुढे जात आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाक मालिकेबाबत रमीज राजांचे मोठे विधान, म्हणाले…
आयपीएलसाठी अफगाणिस्तानचे दोन खेळाडू यूएईत दाखल, संघव्यवस्थापन ठेवणार कुटुंबांवर लक्ष