fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ब्लाॅग: १४ मार्च २००१ – असे खेळले वीर हे दोन!!!

-आदित्य गुंड 

२००१ साली ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्यावर आला होता. मी अकरावीला होतो. त्यावेळेस कसोटी क्रिकेट बघायची आवड नसली तरी स्कोअर काय झाला आहे? हा प्रश्न कायम डोक्यात असायचा. त्यावेळी मोबाईलसुद्धा नव्हते. त्यामुळे ऑनलाईन अपडेटचा प्रश्नच नव्हता. आमचा एक मित्र हांडे कॉलेजच्या अगदी समोरच रहायचा. त्याच्या घरी आम्ही सायकली लावायचो. मॅच असेल तर थोडा वेळ बघून कॉलेजची वेळ झाली की कॉलेजला जात असू. मॅच असेल त्या दिवशी कोणी कॉलेजला लेट आला तर त्याला “ए स्कोअर काय झाला रे?” हा प्रश्न विचारून त्याचे स्वागत होई. आमचा अजून एक वर्गमित्र कॉलेजपासून जवळच बोडकेनगरमध्ये रहात असे. तो क्रिकेटचा दर्दी होता. मधली सुट्टी झाली की तो अक्षरशः पळत घरी जाई. सुट्टीनंतर तो परत येई त्यावेळी त्याच्या भोवती पोरांचे कोंडाळे असे. सगळ्यांना स्कोअर काय झाला हे जाणून घ्यायचे असे. 

त्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया एक तर १५ कसोटी लागोपाठ जिंकून आले होते. त्यांच्याकडे सगळेच भारी खेळाडू होते. ग्लेन मॅकग्रा, जेसन जिलेस्पी, शेन वॉर्न, स्टीव्ह वॉ, हेडन असे खेळाडू असल्यावर कोणाची काय बिशाद ऑस्ट्रेलियाला हरवायची!!. त्या वेळचा तो सर्वात बलाढ्य संघ असे म्हटले जायचे.त्यात त्यांनी मुंबईची पहिली मॅच जिंकून विक्रमाचा आकडा १६ वर नेला होता. भारतीय लोकांचा संयम कुठल्याही बाबतीत कमीच आहे.त्यातही क्रिकेट म्हटलं की एक वाईट चेंडू किंवा एखादी विकेट शिव्या सुरु व्हायला पुरेशी असते.  पहिली कसोटी हरल्यानंतर नेहमीप्रमाणे संघावर टीका झाली. कट्ट्यांवर प्लेयर्सना शिव्या दिल्या गेल्या. त्यावेळी पोरवयातल्या आम्हीसुद्धा भारतीय संघाला शिव्या घातल्याचे आठवते. सचिनच्या सत्तर एक धावा आणि भज्जीच्या ४ विकेट हे मात्र अजूनही लक्षात आहे. 

दुसरी कसोटी ईडन गार्डनला होती. मला स्वतःला भारत हरणार याची खात्री होती. पहिल्याच डावात स्टीव्ह वॉ आणि हेडनने भारतीय गोलंदाजीचा बाजार उठवला. २००१ साली ४४१ धावा खूप असायच्या. भज्जीने हॅटट्रिक घेतली होती एवढच जरा बरं होतं. आपल्याला काही जमणार नाही याच्यावर माझी आणि दादांची चर्चासुद्धा झाली. अपेक्षेप्रमाणे आपला पहिला डाव स्वस्तात आटोपला. स्वस्त म्हणजे तरी किती? तर १७१ मध्ये ऑल आऊट. लक्ष्मणची हाफ सेंचुरी हाच काय तो आपल्या बॅटिंगचा प्लस पॉइंट होता. एवढी मोठी आघाडी असताना स्टीव्ह वॉ सारखा कसलेला कर्णधार कशाला परत बॅटिंग करेल? त्याने आपल्याला फॉलोऑन दिला. 

आपला दुसरा डावसुद्धा स्वस्तात जाणार हे भाकित सगळ्यांनीच वर्तवले होते. माझ्यातला दर्दी क्रिकेटरसिक मला शांत बसू देत नसे. भारत कितीही वाईट खेळत असला तरी मी कॉलेजला जाण्याअगोदर थोडावेळ का होईना मार्च बघत असे. 

“त्या बावळटांना काय बघतो?हरणार आहेत.” दादा मला म्हणत.  

लक्ष्मणाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना काय होते माहित नाही. बाकी सगळे आऊट झाले तरी हा पठ्ठ्या पन्नास तरी काढायचा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच असली की आधी त्याला घ्या मग बाकीच्यांना!! अशी चर्चा आम्ही करत असू. तिसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा लक्ष्मण १०९ आणि द्रविड ७ धावांवर नाबाद खेळत होते. तरी आमच्या आशा नव्हत्याच. 

चौथ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्याअगोदर मी मॅच पाहिली. कॉलेजला गेल्यावर हांडेच्या घरी परत एकदा स्कोअर पाहिला. 

“हे दोघं टिकले पाहिजेत राव. तरच चान्स आहे आपल्याला.” अशी चर्चा करत आम्ही कॉलेजला गेलो. 

मधली सुट्टी झाल्यावर आम्ही वेळ न दवडता हांडेंच्या घरी गेलो. लक्ष्मण आणि द्रविड अजूनही होते. लक्ष्मणचे १५० होऊन गेले होते आणि द्रविड शंभर करेल असे वाटत होते. कॉलेजची वेळ झाली म्हणून आम्ही परत गेलो. कॉलेज सुटल्यावर शेवटच्या अर्ध्या तासाचा खेळ पहायला मिळावा म्हणून  जो तो घाईने आपल्या घरी गेला. लक्ष्मण आणि द्रविडने त्या दिवशी कमाल केली होती. दोघं आऊट व्हायचं नावच घेत नव्हते. दिवस संपला तेव्हा लक्ष्मण २७५ आणि द्रविड ११५ वर खेळत होता. लक्ष्मणने गावसकरचा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला होता. भारताची धावसंख्या होती ५८९. संपूर्ण दिवसाच्या खेळात एकही विकेट गेली नव्हती. काय खेळले असतील हे दोघं? असा विचार आता मनात येतो. त्या दिवशी स्टीव्ह वॉ स्वतः आणि गिलख्रिस्ट सोडून बाकी सगळ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉलिंग केली होती. हेडनसारख्या फलंदाजाने सुद्धा ह्या मॅचमध्ये सहा ओव्हर टाकल्या होत्या यावरून स्टीव्ह वॉ किती हतबुद्ध झाला असेल याची कल्पना येते. 

दादा घरी आले तेव्हा मी त्यांना म्हणालो, 

“तुम्ही म्हणत होते ना बावळट. आता बघा. या दोघांनी वाट लावली ऑस्ट्रेलियाची.”

दुसऱ्या दिवशी सकाळी शिकवणीमध्ये हीच चर्चा होती. जो तो द्रविड आणि लक्ष्मणचे गोडवे गात होता. हेच आम्ही पहिल्या कसोटीनंतर भारतीय संघाला शिव्या देत होतो. 

“काय खेळलेत राव.”

“एवढं दमूनसुध्दा दोघांनी विकेट नाही सोडली.” अशी वाक्य ऐकायला येत होती.  

“आज भारत जिंकणार.” सगळेच असे म्हणत होते. 

त्या दिवशी लक्ष्मण २८१ वर आऊट झाला आणि थोड्या वेळात द्रविड आउट झाला. भारताने आपला डाव ६५७ वर घोषित केला. या सामन्याअगोदर भारतात कधीही चौथ्या डावात कोणी ३०० हुन जास्त धावा केल्या नव्हत्या. ऑस्ट्रेलियाला तर ३१० धावा हव्या होत्या. अपेक्षेप्रमाणे त्यांचा डाव लवकर आटोपला. भज्जीने ६ आणि एकच ओव्हर टाकणार म्हणून बॉलिंगला आलेल्या सचिनने ३ विकेट घेतल्या होत्या. ईडन गार्डनवर भारतीय संघाने इतिहास घडवला होता. १७ वर्षे झाली पण अजूनही लक्ष्मण द्रविडची भागीदारी, भारताचा विजय ठळक आठवतात. हा लेख लिहीत असताना दिवंगत समालोचक टोनी ग्रेग यांचीसुद्धा आठवण आली. या कसोटीमध्ये त्यांच्या कॉमेंट्रीने विशेष रंग भरले होते. 

You might also like