१७ वर्षाखालील मुले/मुली राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०१९-२० क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा यांच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी सकाळ सत्रात स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मा. श्रीमती भारतीताई लव्हेकर यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी श्री कपिल पाटील आमदार शिक्षक मतदार संघ, श्री. एन बी मोटे उपसंचालक, मुंबई विभाग, नगरसेविका प्रतिमा खोपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुवेंद्र ठाकुर, चिल्डरन वेलफेअर सेंटर हायस्कूलचे प्राचार्य श्री अजय कौल, चेयरमन प्रशांत काशीद, आंतरराष्ट्रीय खेळाडू सायली जाधव, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे पंच अध्यक्ष रमेश हरियाण व पंच सचिव दत्ता झिंजुर्डे आणि संपूर्ण स्पर्धा आयोजनाची जबाबदारी असलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यादी मान्यवर उपस्थित होते.
खेळाडूंची परेड, ध्वजारोहण, क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुले गटात लातूर विभाग विरुद्ध अमरावती विभाग असा उद्घाटन सामना झाला. तर मुली विभागात कोल्हापूर विभाग विरुद्ध नागपूर विभाग असा सामना झाला.
अमरावती विरुद्ध लातूर मुलांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत २९-२४ अशी अमरावतीकडे आघाडी होती. परंतु नंतर लातूरने जोरदार खेळ करत सामना फिरवला. कुणाल जगताप व सचिन राठोड यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर लातूरने ५४-३९ असा एकतर्फी विजय मिळवला.
मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने ७६-३० असा नागपूर विभागाचा धुव्वा उडवला. कोल्हापूरकडून श्रध्दा माने हिने अष्टपैलू खेळ करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तिला अनुजा शिंदे व किरण लोडणकर यांनी चांगली साथ दिली. नागपूरकडून करिष्मा सय्यदने एकाकी झुंज दिली.
सायंकाळ सत्रात होणारे आजचे सामने.
मुले:-
नागपूर विभाग विरुद्ध कोल्हापूर विभाग
मुंबई विभाग विरुद्ध पुणे विभाग
औरंगाबाद विभाग विभाग नाशिक विभाग
मुली:-
अमरावती विभाग विरुद्ध लातूर विभाग
मुंबई विभाग विरुद्ध नाशिक विभाग
पुणे विभाग विरुद्ध औरंगाबाद विभाग