चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये आयपीएल 2023च्या 49व्या सामन्यात आमने-सामने होते. शनिवारी (दि. 6 मे) या सामन्यात मुंबई संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. या सामन्यात मुंबईची सुरुवात तशी खराब झाली, पण नंतर फलंदाज नेहाल वढेरा मुंबई संघाचा डाव वेगाने पुढे नेत होता. यावेळी त्याची फलंदाजी पाहून कदाचित चेन्नई संघासह चाहत्यांनाही घाम फुटला असेल. मात्र, चेन्नईचा युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना याने तुफान फटकेबाजी करणाऱ्या नेहालचा त्रिफळा उडवत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्यानचा त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई संघ नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरला होता. यावेळी मुंबईने पहिले तीन विकेट्स झटपट 3 षटकाच्या आतच गमावल्या होत्या. मुंबईने पहिली विकेट दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर 13 धावसंख्या असताना कॅमरून ग्रीन (6) याच्या रूपात गमावली. त्यानंतर मुंबईला तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ईशान किशन (7) याच्या रूपात धक्का बसला. फलंदाजीला उतरलेल्या कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यालाही यावेळी खास कामगिरी करता आली नाही. तोही 3 चेंडूत 0 धावावर तंबूत परतला. यानंतर तीन फलंदाजांनी मुंबईचा डाव सावरला. त्यात सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा समावेश होता.
सूर्या आणि नेहालमध्ये चौथ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी रचली. त्यात दोघांच्याही प्रत्येकी 26 धावांचा समावेश होता. त्यानंतर सूर्या 26 धावांवर बाद झाल्यानंतर नेहालने स्टब्ससोबत पाचव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. यामध्ये स्टब्सच्या 13 आणि नेहालच्या 37 धावांचा समावेश होता. नेहाल यावेळी 51 चेंडूत 64 धावांवर खेळत होता. यामध्ये 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. मात्र, चेन्नईकडून 18वे षटक टाकत असलेल्या मथीशा पथिराना याच्या गोलंदाजीवर नेहालला विकेट गमवावी लागली.
दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा सारखी गोलंदाजी ऍक्शन करत असल्यामुळे पथिरानाला चाहते ‘बेबी मलिंगा’ म्हणून ओळखतात. याच पथिरानाने पहिला चेंडू स्टब्सला टाकला. त्यावर त्याने धाव घेतली नाही. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर स्टब्सने एक धाव घेत स्ट्राईक नेहालला दिली. नेहालने पथिरानाचा तिसरा चेंडू खेळताना थोडं पुढे सरकताच गोलंदाजाने वेगवान यॉर्कर चेंडू टाकला आणि नेहालला त्रिफळाचीत केले. यावेळी नेहालची विकेट घेणारा त्याचा यॉर्कर चेंडू पाहण्यासारखा होता.
𝙔𝙊𝙍𝙆𝙀𝘿!
A remarkable delivery from Pathirana to dismiss the well-set Wadhera 👏🏻👏🏻#TATAIPL | #CSKvMI pic.twitter.com/G9N2m6BeYQ
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
नेहाल बाद झाला तेव्हा मुंबईची धावसंख्या 5 बाद 123 होती. त्यानंतर मुंबईने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. मुंबईने पूर्ण 20 षटके खेळून 8 विकेट्स गमावत 139 धावाच केल्या. यावेळी सामन्यात पथिरानाने 4 षटके गोलंदाजी करताना फक्त 15 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स नावावर केल्या. (pacer Matheesha Pathirana cleans up Nehal Wadhera With A Pinpoint Yorker Around His Legs see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात या तिघांपैकी एक घेणार केएल राहुलची जागा! जाणून घ्या त्यांच्याविषयी
पथिरानाच्या वेगापुढे मुंबईने 139 धावांवर टेकले गुडघे, चेन्नई करणार का यशस्वी पाठलाग?