नवी दिल्ली| पहाडी बिल्लाज संघाला केकेएफआय 2021 खो खो सुपर लीग चॅम्पियनशिपचे जेतेपद मिळवले. त्यामध्ये महाराष्ट्रच्या प्रतीक वाईकरने चमकदार कामगिरी केली. पहाडी बिल्लाज संघाने नवी दिल्ली येथे झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात पँथर्स संघावर सहा गुणांनी विजय मिळवला.
इंदीरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत कर्णधार वाईकरने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर संघाने 31-25 असा विजय मिळवला. वाईकरने संपूर्ण स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. त्याने बचावात एक मिनिट व 50 सेकंद वेळ घालवला तर, संघाला 11 गुणांची कमाई देखील करून दिली.त्याला रेल्वेच्या निलेश पाटील आणि केरळच्या महेश एम. यांनी चांगली साथ दिली. महेशने बचावात एक मिनिट आणि 40 सेकंद वेळ दिला तर, निलेशने सहा गुणांची कमाई केली.
केकेएफआय आणि अल्टिमेट खो खो (यूकेके) यांनी प्रथमच वैज्ञानिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. सुरू असलेली ही स्पर्धा खेळाडू मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग आहे. पुरुष संघातील विजेत्या आणि उपविजेत्या संघास अनुक्रमे 2लाख व 1.50 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तर, तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात आले. तर, महिला संघांना प्रत्येकी 30 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. पश्चिम बंगालचा सुभाशिष संतराने पँथर्स संघाकडून महत्त्वाची कामगिरी केली. त्याने बचावात 1 मिनिट 50 सेकंद वेळ देत नंतर आठ गुणांची कमाई केली.
महाराष्ट्रच्या तीन खेळाडूंना स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. सोलापूरचा रामजी कश्यपला सर्वोत्तम चेसर आणि ठाण्याच्या महेश शिंदेला सर्वोत्तम रनरचा पुरस्कार मिळाला.त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. चॅम्पियनशिपमधील सर्वोत्तम वजीर पुरस्कार आणि 75 हजार रुपयांचे बक्षीस कोल्हापूरच्या अभिनंदन पाटीलला मिळाले आणि आंध्रप्रदेशच्या पी सिवा रेड्डीला सर्वोत्तम पोल डायवर म्हणून 50 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम स्कायडाईव्हकरता मध्यप्रदेशच्या सचिन भारगो याला 50 हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
महिला स्पर्धेत पँथर्स संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले. त्यांनी शेवटच्या दिवशी चिताज विरुद्ध नऊ गुणांनी विजय मिळवला. त्यांचा हा सलग चौथा विजय आहे. त्यामुळे त्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. त्यापूर्वी पुरुष गटाच्या उपांत्यफेरीच्या लढतीत पँथर्स संघाने जगुअर्स संघाला 43-35 असे आठ गुणांनी तर, पहाडी बिल्लाजने चिताजला(41-34) दुसऱ्या लढतीत सात गुणांनी पराभूत केले.