सध्या भारतीय प्रसारमाध्यमांनी बॉलिवुडमधील ड्रग्ज प्रकरण अतिशय उचलून धरले आहे. यामध्ये अनेक मोठ्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. बॉलिवूड व क्रिकेट हे कायम एकमेकाला पूरक ठरले आहेत. बॉलिवूडमधील मंडळी व क्रिकेटपटूंचे घनिष्ठ संबंध आहेत. बॉलिवूडमध्ये एवढे मोठे प्रकरण गाजत असताना त्याचे लोण क्रिकेटपर्यंत येणे थांबणार नव्हते. अभिनेत्री शर्लिन चोप्राने नुकताच आरोप केला आहे की, आयपीएलनंतर होणाऱ्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे सेवन केले जाते. बॉलीवूडमूळे जरी आज क्रिकेट संशयाच्या भोवऱ्यात असले तरी एका क्रिकेटपटूवर बर्याच वर्षांपूर्वी ड्रग्ज घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा खेळाडू भारतीय नसला तरी, या प्रकरणाचा भारताशी थेट संबंध होता. हा विदेशी खेळाडू होता, पाकिस्तानला विश्वचषक जिंकून देणारे महान अष्टपैलू खेळाडू इम्रान खान.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू इम्रान खान यांचे पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वात महत्वपूर्ण योगदान आहे. १९९२ विश्वविजेत्या संघाचे ते कर्णधार होते. सद्यस्थितीत ते पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. मात्र पंतप्रधान होण्याआधी आणि नंतरही त्यांच्यावर अनेकदा ड्रग्ज सेवन करत असल्याचे आरोप करण्यात आले.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राहिलेल्या कासिम उमर यांनी सर्वप्रथम इम्रान यांच्यावर ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला होता. उमर म्हटलेले, “१९८७ च्या भारत दौऱ्यावर इम्रान यांनी ड्रग्ज घेतले होते. इम्रान अनेक बड्या बड्या क्रिकेटपटूंसमवेत ड्रग्ज घेत. ज्यात बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्री देखील सहभागी होत.”
उमर यांच्या आरोपानंतर पाकिस्तानात व पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ माजली होती. या प्रकरणाची थोडीफार चौकशी केली गेली, मात्र नंतर हे प्रकरण दाबण्यात आले. त्यानंतर काही दिवसातच पुन्हा पाकिस्तानचे दुसरे खेळाडू युनूस अहमद यांनीदेखील इम्रान यांच्यावर तसाच आरोप लावला.
अहमद यांनी आपल्या आरोपात स्पष्ट सांगितले की, “१९८७ भारत दौऱ्यावर कोलकता कसोटी दरम्यान एका अलिशान बंगल्यावर ड्रग्जची पार्टी दिली गेली होती. या पार्टीचे आयोजन दोन सुंदर मुलींनी केले होते. या दोन्ही मुली इम्रानशी आधीच परिचित होत्या. इम्रानने आम्हालाही या पार्टीमध्ये आमंत्रित केले होते आणि म्हटले होते की, संध्याकाळी पार्टीला जाऊ, खूप मजा येईल, तेथे बऱ्याच मुली असतील.”
अहमद यांनी त्या पार्टीतील घटनाक्रम उलगडताना सांगितले की, “मी आणि इम्रान एकत्र होतो. मग, इम्रानशी परिचित काही लोक आले. त्यांनी इम्रानला सिगारेट दिली. मला आश्चर्य वाटले कारण, इम्रानने सिगारेट ओढली नाही. पण ती सामान्य सिगारेट नव्हती तर त्यात ड्रग्ज भरले होते. कदाचित, त्यात चरस होता. त्याच मालिकेत मी इम्रानला बेंगळुरूच्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये ड्रग्स घेतानाही पाहिले. बेंगलोर कसोटीत मिळवलेल्या विजयानंतर, झालेल्या पार्टीत इम्रान काही तरुणीसोबत नाचत होता.”
इम्रान यांच्यावर ड्रग्ज सेवनाचे सर्वात गंभीर आरोप त्यांची पूर्व पत्नी रेहम खान यांनी लावले. इम्रान खान यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर रेहम खान यांनी, आपला आत्मचरित्रात इम्रान यांच्यासंबंधी अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यापैकी ड्रग्जविषयी त्यांनी अत्यंत सविस्तरपणे लिहिले होते. रेहम लिहतात, “इम्रान हे पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेले होते. प्रत्येक रात्री ते ६ ग्रॅम कोकेनचे सेवन करत. कधीकधी तर एका रात्रीत ते अनेकदा ड्रग्ज घेत. राजकारणातील अपयशामुळे कदाचित ते निराश होते. हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पाहून देखील काही करू शकत नव्हते.”
रेहम पुढे लिहितात, “बर्याच वेळा कागदाच्या गुंडाळ्या बनवून काही ड्रग्ज ते सिगरेटसारखे ओढत. त्यात एक काळा पदार्थ भरलेला असत. कधीकधी ते दुपारी ते पिण्यास सुरू करायचे. ते मला सांगत की, हे मारिजुआना आहे पण त्याचा वास वेगळा येत. अंमली पदार्थविरोधी अभियानांतर्गत चित्रपट बनवताना मला समजले की, इम्रान जे पित ते हेरॉइन होते. इम्रान अनेकदा मला ड्रग्ज सोडण्याचे वचन देत, मात्र ते कधीही पाळत नसत. एकदा मी बाथरूममध्ये सापडलेल्या कोकेनविषयी त्यांना विचारले असता, माफी मागण्यासाठी त्यांनी माझे पाय धरले.”
या सर्व आरोपांचे इम्रान खान यांनी वारंवार खंडन केले. या सर्व आरोपांची कधीच निष्पक्ष व खोलात जाऊन चौकशी न झाल्याने हे सर्व आरोप हवेत विरले.