सन २००९ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर लाहोर येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे सुमारे दशकभर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे, पाकिस्तान संघ यूएई येथे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करायचा. आता अखेरीस, पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होणार आहे. २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारखे मोठे संघ पाकिस्तानचा दौरा करण्यासाठी तयार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
आम्ही इतर क्रिकेट बोर्डाशी संबंध सुधारत आहोत
पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी प्रेस असोसिएटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “आम्ही इतर देशांच्या क्रिकेट बोर्डाशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. आम्ही या सर्व खेळाडूंचा स्वागताला सज्ज आहोत.”
तीन मोठे संघ करणार पुढील वर्षी पाकिस्तानचा दौरा
दक्षिण आफ्रिका संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला येणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा भाग असेल. त्यानंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची टी२० मालिकाही खेळवली जाईल. न्यूझीलंडचा संघ सप्टेंबरमध्ये तीन वनडे आणि पाच टी२० सामने पाकिस्तानात खेळेल. त्यानंतर इंग्लंड दोन टी२० सामन्यांसाठी पाकिस्तानचा दौरा करेल. २००५ नंतर इंग्लंडचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा असेल.
२०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया खेळणार पाकिस्तानमध्ये
पीसीबीने डिसेंबर २०२१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेचीही योजना आखली आहे. त्याविषयी बोलताना खान म्हणाले, “आमच्यासाठी पुढील आठ-दहा महिने देशातील क्रिकेटच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे आहेत. आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबरही चर्चा करत आहोत. २०२२ च्या क्रिकेट सत्रादरम्यान ते पाकिस्तान दौऱ्यावर येतील. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानमध्ये जास्तीत जास्त क्रिकेट खेळावे अशी आमची अपेक्षा आहे.”
पाकिस्तानातील क्रिकेट होते अनेक वर्ष बंद
श्रीलंकेच्या संघावर २००९ मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे बंद झाले होते. झिम्बाब्वे पाकिस्तान दौर्यावर जाणारा पहिला संघ ठरला. २०१५ मध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. मागील वर्षी श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तान दौरा केला होता. बांगलादेश संघदेखील पाकिस्तानमध्ये दोन कसोटी सामने खेळणार होता. मात्र, पहिल्या कसोटीनंतर कोविड-१९ मुळे दुसरी कसोटी स्थगित करण्यात आली होती.
पीएसएलमध्ये खेळलेत बरेच आंतरराष्ट्रीय खेळाडू
पाकिस्तान सुपर लीगच्या निमित्ताने, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन तसेच दक्षिण आफ्रिकेचे डेल स्टेन आणि एबी डिविलियर्ससारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू पाकिस्तानात खेळले आहेत. या खेळाडूंनी पाकिस्तान आता पहिल्यापेक्षा सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता.
इतर आंतरराष्ट्रीय पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार असले, तरी पाकिस्तान आणि भारत यांच्यात पुन्हा क्रिकेट पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही देशांतील राजकीय संबंध सलोख्याचे नसल्याने हे दोन्ही शेजारी देश केवळ विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एशिया कप सारख्या बड्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांविरूद्ध खेळतात.
महत्त्वाच्या बातम्या-
“होय, गांगुलीचा ‘तो’ झेल शंकास्पद होता”, इंजमामची २१ वर्षांनंतर कबुली
‘हताश होऊ नको, मेहनत कर’, ‘या’ खेळाडूला सचिनने पाठवला होता खास संदेश
‘पॉंटिंग फिरकीचा कच्चा खेळाडू’, भारतीय दिग्गजाकडून ‘पंटर’ची पोलखोल