पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील राजकीय संघर्षामुळे श्रीलंकेचा ‘अ’ संघ पाकिस्तान ‘अ’ संघाविरुद्ध सुरू असलेली मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मंगळवारी पुष्टी केली की, श्रीलंका क्रिकेट सोबत सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी पाकिस्तान ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील शेवटचे दोन 50 षटकांचे सामने पुढे ढकलले आहेत.
पुढे ढकललेले सामने बुधवारी आणि शुक्रवारी रावळपिंडीत खेळले जाणार होते. इस्लामाबाद येथे सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं पाहुण्या संघाचा 108 धावांनी पराभव केला. पीसीबीनं सांगितलं की, मालिका पूर्ण करण्यासाठी दोन्ही बोर्ड मिळून नवीन तारखा निश्चित करतील.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षानं रविवारपासून इस्लामाबादकडे निषेध मोर्चा सुरू केला आहे. आंदोलक आणि कायदा अंमलबजावणी संस्था आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती शांत करण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी केली होती. नक्वी हे पीसीबीचे अध्यक्षही आहेत.
या हिंसाचारानंतर फेडरल सरकारनं राजधानीत सैन्य तैनात केलं असून, हल्लेखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान (72) गेल्या वर्षी ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. त्यांनी 13 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर रोजी देशव्यापी निदर्शनं करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी कथितपणे चोरी केलेला जनादेश, लोकांना अटक करणं आणि 26 वी घटनादुरुस्ती संमत केल्याचा निषेध केला होता.
पाकिस्तानात पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघानं तेथे जाण्यास नकार दिला. यावरून आता मोठा पेच निर्माण झाला आहे. पीसीबी हायब्रीड मॉडेलं अंतर्गत स्पर्धा आयोजित करण्याच्या विरोधात आहे. आता या नव्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसी काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
27 कोटींना विकल्या गेलेल्या पंतला पूर्ण पैसे मिळणार नाही, टॅक्समध्ये द्यावी लागणार चक्क इतकी रक्कम!
या दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रश्न सुटणार! आयसीसीने आखली विशेष योजना
NZ VS ENG; या दोन महान खेळाडूंच्या नावावर कसोटी मालिका, ट्रॉफीमध्ये बॅटचाही वापर