पुणे। लोढा बेलमोंडो गोल्फ कोर्सवर नुकत्याच सुरु झालेल्या एस गोल्फिंग वतीने आयोजित ब्रिजस्टोन गोल्फ प्रीमियर लीग स्पर्धेत आदित्य पांडे, जगदीश बेलवल या नवोदित हौशी खेळाडूंनी उदघाटनाचा दिवस गाजवला.
पुणे मुंबई एक्सप्रेसवे जवळ असलेल्या या गोल्फ कोर्सवरील एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेत सहा संघांचा समावेश असून स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. अट पार ५४ दर्जा असलेल्या लोढा, बेलमोंडो गोल्फ कोर्सवर पहिल्या फेरीत पांडे व बेलवल या दोघांनी ६ ओव्हर पार ६० अशा कामगिरीची नोंद केली. मात्र, आदित्य पांडेच्या चमकदार कामगिरी नंतरही त्याच्या ऍमिगोज संघाला पहिली लढत जिंकण्यात अपयश आले व त्यांची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली. इगल स्ट्रायकर्स(२) आणि बिंदास बॉईज(२) हे संघ पहिल्या दोन स्थानांवर राहिले. ईगल स्ट्रायकर्सच्या जय ठाकूरनेही ९ ओव्हर पार ६३ अशी आश्वासक कामगिरी केली.
प्रत्येक आठवड्याच्या शेवटी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला एक्को आणि मेश्वर्क्स अशा नामांकित ब्रँडचे प्रायोजकत्व लाभले असून एकूण ७२ खेळाडूंची बिंदास बॉईज, इगल स्ट्रायकर्स, नाऊ मार्व्हेल, रिगल वॉरियर्स, ऍमिगोज आणि एअर स्ट्रायकर्स या संघात विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी १२ डिसेंबर रोजी खेळली जाणार असून साखळी स्पर्धेतील दोन अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. अंतिम फेरी सुधारित रायर्डस कप फॉरमॅटवर खेळली जाणार आहे. हा फॉरमॅट एस गोल्फिंगच्या आदित्य मालपाणी यांनी तयार केला आहे.
या स्पर्धेविषयी बोलताना आदित्य मालपाणी म्हणाले की, हे सर्व खेळाडू हौशी असल्यामुळे या स्तरावर ६ ओव्हर पार ६० ही कामगिरी खूपच चांगली म्हणावी लागेल. याचा अर्थ हे खेळाडू प्लस ६ या हॅंडीकॅपवर खेळात आहेत. व्यावसायिक खेळाडू प्लस १० हॅंडीकॅप घेऊन खेळत असतात. त्यामुळे या खेळाडूंची कामगिरी खूपच चांगली आहे.