मुंबई । जे आजवर कुणा आयोजकाला जमलं नाही ते अनेक शरीरसौष्ठवपटूंचा मार्गदर्शक, सच्चा दोस्त आणि गॉडफादर असलेल्या मनीष आडविलकरने “परळ श्री”स्पर्धेत करून दाखवलं. एकीकडे मुंबई श्री विजेत्याला सव्वा लाखांचा इनाम मिळाला होता तर महाराष्ट्र श्री विजेत्या सुनीत जाधवला दीड लाख रूपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते, पण मुंबई शहरातील म्हणजेच कुलाबापासून चेंबूरपर्यंत राहात असलेल्या स्थानिक शरीरसौष्ठवपटूंसाठी आयोजित “परळ श्री” या स्थानिक शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेत्या पाऊणे दोन लाखांची रॉयल एनफिल्ड देऊन मनीषने प्रोत्साहित केले. परळच्याच हर्क्युलस फिटनेसच्या जालिंदर आपकेने गतविजेत्या सुशील मुरकरचे कडवे आव्हान मोडित काढत रॉयल एनफिल्डवर विराजमान होण्याचा मान मिळविला. तसेच विजेत्याला शक्तिची देवता हनुमानाची मूर्ती पुरस्कार रूपाने देऊनही गौरविण्यात आले. फिजीक स्पोर्टस्चा विजेता रोहन कदम ऍक्टिव्हाचा मानकरी ठरला. शरीरसौष्ठवाच्या इतिहासात प्रथमच एका स्थानिक स्पर्धेत विजेत्यांना रॉयल एनफिल्ड आणि ऍक्टिव्हा या बाइक देण्यात आल्या.
गेल्यावर्षापासून सुरू झालेली “परळ श्री ” यावेळी आपल्या रॉयल एनफिल्ड आणि फक्त मुंबई शहरातील खेळाडूंनाच दिलेल्या संधीमुळे लक्षात राहिली. तीन आठवड्यांपूर्वी मनीष आडविलकरने परळ श्रीची घोषणा केली तेव्हाच स्पष्ट केले होते की ही स्पर्धा फक्त आणि फक्त मुंबई शहरातल्या खेळाडूंसाठी असेल. स्पर्धेची बक्षीसेही आकर्षक असतील, असे तो वारंवार म्हणत होता. त्याने शरीरसौष्ठव स्पर्धा टॉपटेन असेल आणि फिजीक स्पोर्टस् मध्ये पहिल्या सहा खेळाडूंना रोख पुरस्कार दिले जातील, असे जाहीर केले होते. पण चार दिवसांपूर्वी त्याने परळ श्री विजेत्याला रॉयल एनफिल्ड असल्याचे जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. क्रीडाप्रेमी दिनेश पुजारी यांनी मनीष आडविलकरच्या शरीरसौष्ठव प्रेमाला प्रोत्साहन म्हणून आपल्dयाकडून एनफिल्ड दिली तर सुल्तान खान यांनी फिजीक स्पोर्टस् च्या विजेत्याला ऍक्टीव्हा देऊन या स्पर्धेला चार चाँद लावले. एवढेच नव्हे तर मुंबई श्री पुरस्कृत करणाऱया स्पार्टन न्यूट्रिशन्सचे वृषभ चोकसी परळ श्रीच्या मागेही खंबीरपणे उभे राहिले. तसेच आयटीएल ट्रव्हल्सचे अन्सार मोहम्मद, ऍव्हेटर, प्रोबस्ट, मसल गिअर या न्यूट्रिशन्सने आर्थिक सहकार्य केल्dयामुळे स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना उत्तेजनार्थ बक्षीसं देण्यात आल्dयाची माहिती परळ श्रीचे सर्वेसर्वा मनीष आडविलकर यांनी दिली.
परळ श्रीसाठी तगडी स्पर्धा
परळ श्री स्पर्धेत कुलाब्यापासून चेंबूरपर्यंतचेच खेळाडू सहभागी होऊ शकत असल्यामुळे स्पर्धेत खेळू न शकणाऱ्या आणि पूर्ण तयारीत असलेल्या मुंबई उपनगरातल्या खेळाडूंचा जीव अक्षरशा जळत होता. स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडूंना आधारकार्ड तपासूनच प्रवेश दिला जात होता. स्पर्धा टॉप टेन असली तरी 56खेळाडूंनी आपली उपस्थिती नोंदविली. इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धक परळ श्रीला उतरल्यामुळे मनीष आडविलकरने तात्काळ टॉप टेन ऐवजी टॉप 20 खेळाडूंना रोख पुरस्कार जाहीर केले. आधी 56 खेळाडूंमधून 30 खेळाडू निवडण्यात आले. मग त्यातून 20 खेळाडूंची निवड करण्यात आली . त्यानंतर 20 मधून टॉप टेन जाहीर करण्यापूर्वी उर्वरित 10 खेळाडूंना मनीषने सन्मानित केलं. टॉप टेनमधल्या पहिल्या सहा खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस दिसली. गेल्यावर्षी मुंबई श्री झालेला सुजन पिळणकर पाचवा आला. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की स्पर्धा किती तगडी होती ती. या शर्यतीत सुशांत पवार चौथा तर दीपक तांबीटकर तिसरा आला. तेव्हा परळ श्री विजेत्याच्या नावाची उत्कंठा अक्षरश: शिगेला पोहोचली होती. गतविजेता आणि महाराष्ट्र श्री च्या 85 किलो वजनी गटात सुवर्ण कामगिरी करणाऱया सुशील मुरकरकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण गेल्या महिन्याभरापासून प्रशिक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेल्या जालिंदर आपकेने मुरकरवर मात केली. पुन्हा एकदा चव्हाणांच्या शिष्याने त्याला पराभवाचा धक्का दिला. महिन्याभरापूर्वी चव्हाणांच्याच अनिल बिलावाने मुरकरकडून मुंबई श्रीचे संभाव्य जेतेपद हिसकावून घेतले होते.
पुढच्या वर्षी आणखी भव्य आणि दिव्य परळ श्री
आपल्या स्थानिक खेळाडूंनाही संधी मिळावी… मोठी बक्षीसं मिळावीत… प्रोत्साहन मिळावं म्हणूनच मी गेल्यावर्षापासून परळ श्रीचं आयोजन सुरू केलंय. गेल्यावर्षीही मी मोठी बक्षीस ठेवली होती. यावेळी माझ्या शरीरसौष्ठवावरील प्रेमामुळे माझ्या मित्रांनी स्पर्धा आणखी मोठी व्हावी म्हणून रॉयल एनफिल्ड दिली. एकाने ऍक्टिव्हा दिली. माझी इच्छा तर माझ्या खेळाडूला कार देण्याची आहे. ती इच्छासुद्धा मी भविष्यात पूर्ण करीन. परळ श्रीच्या दिमाखदार आयोजनामुळे ही स्पर्धा आणखी मोठी व्हावी, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे 2020 ची परळ श्री ही सर्वांसाठी खुली असेल. यंदाच्या स्पर्धेपेक्षाही मोठी आणि दिमाखदार असेल. या स्पर्धेच्या किताब विजेत्याला दिलं जाणार बक्षीसही तितकंच भव्य दिव्य आणि दिमाखदार असेल, असा दृढ विश्वास मनीष आडविलकरने याप्रसंगी बोलून दाखविला. त्याचबरोबर स्थानिक खेळाडूंसाठीही वेगळा गट आणि वेगळा पुरस्कार असेल असेही त्याने आवर्जून सांगितले.
तीन भारत श्री एकाच मंचावर
शरीरसौष्ठवपटूंसाठी आयडॉल असलेले सुहास खामकर आणि श्याम रहाटे अनेक वर्षानंतर एकाच मंचावर दिसले. शरीरसौष्ठव संघटनांमध्ये असलेल्या वादामुळे गेले काही वर्षे सुहास खामकर वेगळ्या संघटनेकडून खेळतोय तर त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या श्याम रहाटेने आता स्पर्धात्मक शरीरसौष्ठवातून जवळजवळ निवृत्ती घेतलीय. आठ-दहा वर्षापूर्वी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या हा दोघा भारत श्री विजेत्यांना परळ श्रीच्या निमित्ताने मनीष आडविलकरने एका मंचावर आणण्याचे धाडस दाखवले. तसेच आशिया श्री सुनीत जाधवने या दोघांमध्ये एण्ट्री केल्यामुळे शरीरसौष्ठवाचे स्टार परळ श्रीच्या मंचावर एकाच क्षणी अवतरले. विशेष म्हणजे तिघेही जबरदस्त तयारी होते.त्यांच्या सोबतीला प्रवीण सकपाळ आणि प्रशांत जाधव हे दिग्गज शरीरसौष्ठवपटूही होते.
परळ श्रीचे शरीरसौष्ठव स्पर्धेचे टॉप टेन विजेते ः
1. जालिंदर आपके ( हर्क्युलस फिटनेस), 2. सुशील मुरकर (आरकेएम), 3. दीपक तांबीटकर (रिजस फिटनेस), 4. सुशांत पवार ( बॉडी गॅरेज), 5. सुजन पिळणकर (परब फिटनेस), 6. सुशांत रांजणकर ( आर. एम. भट), 7. राजेश तारवे ( शाहूनगर व्यायामशाळा), 8. अर्जुन कुंचिकुरवे ( गुरूदत्त व्यायामशाळा), 9. अमोल गायकवाड (रिसेट फिटनेस), 10. संदीप कवडे (एचएमवी फिटनेस).
परळ श्री फिटनेस फिजीकचे अव्वल सहा खेळाडू ः
1. रोहन कदम (आर. के. फिटनेस), 2. लवलेश कोळी (गुरूदत्त जिम), 3. निलेश गिरी(आर. के. फिटनेस), 4. मोहम्मद अन्सारी ( आय फ्लेक्स), 5. अनिकेत चव्हाण (रिजस फिटनेस), 6. सरवर अन्सारी (आर.एम.भट),