मुंबई | जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल असणारा ऑस्ट्रेलियाचा सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजाराला गोलंदाजी करणे सर्वात आव्हानात्मक काम असल्याचे सांगितले. पुजारा मधल्या फळीमध्ये फलंदाजी करत आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
तुला कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणे अवघड जाते?असा प्रश्न कमिन्सला ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आयोजित एका कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावेळी कमिन्सने भारतीय कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याला गोलंदाजी करणे अवघड आणि आव्हानात्मक असल्याचे सांगितले.
तंत्रशुद्ध फलंदाजी करणार्या चेतेश्वर पुजाराने २०१८- १९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार कसोटी सामन्याच्या मालिकेत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तीन शतक आणि एक अर्धशतकाच्या जोरावर त्याने सर्वाधिक ५२१ धावा केल्या होत्या. यासोबत त्याला मालिकावीराचा किताबही देण्यात आला होता. त्याच्या या खेळीच्या जोरावरच भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमिवर पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. भारताने ही मालिका २-१अशा फरकाने जिंकली होती.
पॅट कमिन्स चेतेश्वर पुजाराचे कौतुक करताना म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पुजाराला बाद करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तो त्याच्या संघासाठी एका पर्वताप्रमाणे विरोधी संघापुढे उभा होता. याला बाद करणे फारच अवघड होते. तो एकाग्र चित्ताने खेळत होता. माझ्यामते कसोटी क्रिकेटमध्ये त्याला बाद करणे सर्वाधिक अवघड काम आहे.