भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळतो आहे. या मालिकेतील सगळे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जात आहेत. तसेच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण संघ बायो बबलमध्ये राहत आहे.
यातील अनेक खेळाडू गेले काही महिने सतत बायो बबल मध्ये राहत आहेत. मागील वर्षी युएई मधील आयपीएल, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा आणि आता इंग्लंडविरुद्धची मालिका, यामुळे खेळाडूंना सतत हॉटेलच्या रूम मध्ये राहावे लागत आहे. घरापासून इतक्या कालावधीसाठी लांब राहणे, त्यांच्यासाठी नक्कीच त्रासदायक आहे. म्हणूनच भारतीय संघ राहत असलेल्या अहमदाबाद मधील हॉटेलने खेळाडूंना घरच्या वातावरणाचा आभास व्हावा, म्हणून एक खास शक्कल लढवली आहे.
हॉटेल रूमच्या दारावर नेम प्लेट
हॉटेल व्यवस्थापनाने खेळाडूंना घरच्या सारखे वातावरण मिळावे, म्हणून ते राहत असलेल्या हॉटेल रूमला नंबर देणे टाळले आहे. तर नंबर ऐवजी हॉटेल रूमच्या दारावर खेळाडूंच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या रूमच्या दारावर त्याचे नाव, त्याच्या पत्नीचे नाव आणि याशिवाय त्यांची दोन महिन्यांची मुलगी वामिका, यांचे नाव लिहिण्यात आले आहे.
या तिघांचे नाव असलेल्या पाटीचा फोटो सोशल मिडीयावर देखील वेगाने व्हायरल होतो आहे. आणि अशा नेम प्लेट विराटच नव्हे, तर इतरही खेळाडूंच्या रूमच्या दारावर लावण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त हॉटेल व्यवस्थापनाने प्रत्येक रूममध्ये व्यक्तिगत निवडीनुसार उशांची व्यवस्था केली आहे. यावर प्रत्येक राज्याच्या स्थानिक कलाकृतींचा समावेश आहे.
भारतासाठी आजचा सामना महत्वाचा
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत आजचा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण या मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत आव्हान टिकवून ठेवायचे असल्यास आजचा सामना जिंकणे, त्यांच्यासाठी अत्यावश्यक असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
इरफानने पहिल्या षटकात लुटल्या खूप धावा, मग सचिनच्या ‘त्या’ शब्दांनी मिळाली प्रेरणा अन्…
‘हे’ पाच खेळाडू गमावू शकतात आयपीएलच्या पहिल्या आठवड्यातील सामने, जाणून घ्या कारण
टी२० विश्वचषकासाठी भारताची जय्यत तयारी, इंग्लंडनंतर ‘या’ संघांविरुद्ध खेळणार टी२० मालिका