Loading...

खेलो इंडिया युथ गेम्स; महाराष्ट्राचे नऊ मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत

गुवाहाटी । खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या आठ बॉक्सिंग खेळाडूंनी १७ वर्षांखालील गटातून अंतिम फेरी गाठली आहे. यामध्ये मुलांमधून संजित सिंग, विजय सिंग, याईथाबा माईसाई, सईखोम, जयदीप रावत, तर मुलींच्या गटातून देविका घोरपडे, शर्वरी कल्याणकर आणि दिशा पाटिल यांचा समावेश आहे. स्पर्धेतील अन्य एका २१ वर्षांखालील गटातू केवळ भावेश कट्टीमणी यालाच अंतिम पेरी गाठण्यात यश आले.

साई क्रीडा केंद्राच्या संकुलातील हॉलमध्ये आज झालेल्या लढतीत १७ वर्षांखालील गटातून महाराष्ट्राच्या चंदन मरझरी, विजय सिंग यांचे विजय लक्षवेधी ठरले. आजच्या लढतींची महाराष्ट्राची सुरवात सुरेश विश्वनाथ आणि राज पाटिल यांच्या पराभवाने होत असतानाच संजितने आपल्या जबरदस्त आक्रमक खेळाने यजमान आसामच्या चंदन मरझरी याला निष्प्रभ केले.

सरळ पंच आणि दोन्ही हातांच्या ठोशांचा नेमका वापर करून त्याने चंदनला तर जेरीस आणले. त्याचबरोबर चारही जज्जेसना प्रभावित करून ४-१ असा विजय मिळविला. विजयने देखील मणिपूरच्या लालडिनसांगा याचा पराभव करताना असाच आक्रमक खेळ करून जज्जेसकडून एकतर्फी कौल मिळविला.

सकाळच्या या सत्रानंतर दुपारच्या सत्रात याईथाबा (५२ किलो), सईखोम (५४ किलो), जयदीप रावत (६६ किलो) यांनी असाच खेळ करून महाराष्ट्राची आगेकूच कायम राखली. मुलींच्या गटातही शर्वरी (७० किलो) आणि दिशा पाटिल (६३ किलो) गटातून अंतिम फेरी गाठली.

दिशाने बंगाल, तर शर्वरीने हरियानाच्या प्रतिस्पर्धीस हरवले. हरियानाचे खेळाडू वर्चस्व राखत असताना शर्वरीचा विजय महत्वाचा ठरला. तिने आपल्या आक्रमक खेळाने लढत एकतर्फी केली आणि पाचही जज्जेचा कौल मिळवून ५-० असा सहज विजय मिळविला. या गटातून देविकाने काल रविवारीच अंतिम फेरी गाठली आहे.

Loading...

सुवर्णपदकाच्या शर्यतीत हरियानाची स्पर्धा

खेलो इंडियाच्या स्पर्धेचे आता दोन दिवस बाकी असताना महाराष्ट्राने पदकांचे द्विशतक गाठून आघाडी कायम राखली आहे. दुस-या क्रमांकावरील हरियाणा (१३७) एकूण पदकांच्या तुलनेत खूप मागे असले, तरी त्यांची महाराष्ट्राबरोबर सुवर्णपदकाची स्पर्धा होऊ शकते.

हरियानाची ४६ सुवर्णपदके झाली असून, बॉक्सिंगमध्ये त्यांचे तब्बल २९ बॉक्सर अंतिम फेरीत पोचले आहेत. त्यामुळे आता स्पर्धेच्या अखेरच्या दोन दिवसात महाराष्ट्र आणि हरियाना यांच्यातील सुवर्णपदकांची शर्यत उत्कंठावर्धक ठरणार आहे.

बॅडमिंटनमध्ये रिया हब्बू अंतिम फेरीत

बॅडमिंटन प्रकारात महाराष्ट्राच्या रिया हब्बू हिने मुलींच्या १७ वर्षांखालील एकेरीची अंतिम फेरी गाठली. तिने कर्नाटकाच्या अनंताकुमार जनानी हिचा पराभव केला. महाराष्ट्राच्या वरुण कपूर (१७ वर्षांखालील) आणि स्मित तोष्णिवाल (२१ वर्षांखालील) या दोघांना मात्र उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

रियाने अंतिम फेरी गाठताना ए. जाननी हिचा २१-१८, २१-१९ असा पराभव केला. दोन्ही गेम चुरशीने झाल्या. बरोबरीत झालेल्या या दोन्ही गेममध्ये रियाचा संयम आणि तिने खोलवर मारलेले शॉटस निर्णायक ठरले.

पहिल्या गेमला ७-३ अशा सुरुवातीनंतर गेमच्या मध्याला रिया १०-१२ अशी पिछाडीवर राहिली. त्यानंतर एकवेळ रिया १३-१६ अशी पिछाडीवरच राहिली होती. त्या वेळी सलग सहा गुण मिळवत तिने १९-१६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर रियाने प्रतिस्पर्धीस केवळ दोनच गुण मिळू दिले.

दुस-या गेमलाही बरोबरीच्या शर्यतीत गेमच्या मध्याला रिया १०-११ अशी मागे होती. रियाने १०-१२ अशी स्थितीत सलग चार गुणांची कमाई करताना १४-१२ अशी आघाडी मिळविली. मात्र, जाननीने कडवा प्रतिकार करताना पुन्हा एकदा १५-१८ अशी आघाडी मिळविली.

Loading...

रियाने आपल्या फटक्यांचा वेग कमी करून ताकद वाढवताना १९-१८ अशी आघाडी मिळविली. मात्र, पुन्हा एकदा १९-१९ अशी बरोबरी झाली. गेम लांबणार असे वाटत असतानाच जाननीचे फटके बाहेर गेले आणि रियाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

याच वयोगटात मुलांच्या विभागात वरुणला हरियाणाच्या भारत राघवकडून १४-२१,१९-२१ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेमला भारताने ४-६ अशा पिछाडीवरून सलग सहा गुण मिळवत ६-१० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर त्याने ही मोठी आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. दुस-या गेमला वरुणचा खेळ अधिक उंचावला होता.

त्याने फटक्यांवर नियंत्रण राखताना आपल्या वेगवान फटक्यांनी भारतवर वर्चस्व मिळविण्यास सुरवात केली होती. मात्र, कमालीचा संयम राखणा-या भारतने दुस-या गेमला १७-१९ अशा पिछाडीवर आपली सगळी ताकद पणाला लावून सलग चार गुणांची कमाई करत विजय मिळविला. उंचीचा अचूक उपयोग आणि खोलवर स्मॅशला मिळालेली ताकदीची जोड त्याच्यासाठी निर्णायक ठरली.

मुलींच्या २१ वर्षांखालील गटात स्मित तोष्णिवाल गुजरातच्या राष्ट्रीय विजेत्या तस्निम मीरचा सामना करू शकली नाही. तस्निमने सलग दोन गेममध्ये स्मितचा २१-१८, २१-८ असा सहज पराभव केला.

You might also like
Loading...