गुवाहाटी । खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात कुस्ती क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एकूण तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार ब्रॉंझपदकांची कमाई केली. तीनही सुवर्णपदके महाराष्ट्राला १७ वर्षांखालील गटात मुलींनी मिळवून दिली.
लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत कल्याणी गाडेकर (४६ किलो), सोनाली मंडलिक (५७ किलो) आणि भाग्यश्री फंड (६१ किलो) यांनी सुवर्णपदक मिळवून दिले. नेहा चौगुले (४६ किलो), रमणदीप संधु (६९ किलो) रौप्य, तर अनुष्का भट (४९ किलो), स्मिता पाटील (५३ किलो) ब्रॉंझपदकाच्या मानकरी ठरल्या.
मुलांच्या २१ वर्षांखालील गटात ग्रिको रोमन प्रकारात मंगेश कोळी (७२ किलो), अतुल माने (९७ किलो) यांनी ब्रॉंझ, तर विराज रानवडे (७७ किलो) याने रौप्यपदक मिळवून दिले.
मुलींच्या ४६ किलो वजन गटातील सुवर्ण लढत कल्याणी गाडेकर आणि नेहा चौगुले या महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांमध्येच झाली. प्रथमच या स्पर्धेत खेळणा-या कोल्हापूरच्या नेहाने आपल्यापेक्षा ताकदवान असलेल्या कल्याणीला जोरदार झुंज दिली. पण, राष्ट्रीय पातळीवर प्रथमच खेळणा-या नेहाचे प्रयत्न कमी पडले.
घरी काकांकडून कुस्तीचा वारसा घेतलेल्या नेहाने सदाशिव मंडलिक कुस्ती केंद्रातून दादासाहेब लवटे यांच्याकडे मेहनत घेत इथपर्यंत मजल मारली. अनुभव आणि ताकदीत कमी पडले असे तिने प्रांजळपणे कबुले केले. मात्र, भविष्यात चांगली कुस्तीगिर घडण्यासाठी प्रचंड मेहनत घेणार असल्याचे तिने सांगितले.
मुलींच्याच गटात ५७ किलो वजन प्रकारात कर्जतच्या सोनाली मंडलिक हिने जबरदस्त चिकाटीने खेळ करत गेल्या वर्षींच्या ब्रॉंझपदकाचा रंग सोनेरी केली. शेतकरी कुटुंबातून आलेली सोनाली नगरच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्रात किरण मोरे यांच्याकडे प्रशिक्षण घेते.
दिल्लीच्या निकिता विरुद्ध खेळताना तिचा बचाव आणि त्यापेक्षा तिची चिकाटी महत्वाची ठरली. सावध कुस्ती करताना तिने ताबा मिळवत दोन गुणांची कमाई करून पहिली फेरी जिंकली होती. दुस-या फेरीत तिने आपला बचाव भक्कम ठेवला.
मात्र, अखेरच्या टप्प्यात तिने ताबा गमावला आणि दोन गुण गमावले. त्या वेळी प्रतिस्पर्धी काहिशी आक्रमक झाली. तिने सोनालीची पकड घेत ताबा मिळविण्याचा जोरदार प्रयत्न करून लढत मैदानाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात तिला अपयश आले.
अखेरच्या पाच सेकंदातील या नाट्यावर पंचांनी निर्णय न दिल्याने निकिताच्या प्रशिक्षकांनी आक्षेप घेतला. अनेकदा रिप्ले पाहिल्यानंतर पंचांनी आपला निर्णय कायम ठेवला. आक्षेप गमाविल्यामुळे एक गुण सोनालीला मिळाला. तिने लढत गुणांवर ४-२ अशी जिंकली.
आणखी एक सुवर्णपदक विजेती भाग्यश्री हिला फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. आळंदी ते नगर येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अशा प्रवासात तीन आंतरराष्ट्रीय पदकांचा अनुभव असलेल्या भाग्यश्रीने हरियाणाच्या स्विटीचे आव्हान ५-० असे सहज परतवून लावत सुवर्णपदकाची कमाई केली. पट काढून गुण मिळविल्यावर तिने आपल्या आवडत्या भारंदाज डावाचा वापर करून आपले वर्चस्व कायम ठेवले.
भाग्यश्रीने आता ऑलिंपिकची तयारी ठेवली असून, तिने २०२४ ऑलिंपिक खेळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी अगदी प्रामाणिक मेहनत घेणा-या भाग्यश्रीच्या तयारीचे वैशिष्ट्य म्हणजे तीन २६ मिनिटांत ७०० जोर मारते. मेहनतीशिवाय यश नाही हे सूत्रच आहे आणि आपण ती कायम घेणार असे तिने सांगितले.