जागतिक क्रिकेटमध्ये जेवढे खेळाडू क्रिकेट खेळलेत त्यांचं एकदा तरी आपल्या देशाचे नेतृत्त्व करण्याचं स्वप्न असतं. जेव्हा खेळाडू १०० किंवा अधिक सामने खेळतो तेव्हा तर ही अपेक्षा ठेवण्यातही काही गैर नसत.
वनडे क्रिकेटमध्ये बहुतांश वेळा संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर थोडेफार सामने खेळणाऱ्या खेळाडूलाही संघाचे नेतृत्त्त्व करण्याची संधी मिळते.
परंतु जागतिक क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी २५० पेक्षा अधिक वनडे सामने खेळूनही त्यांना संघाचे कर्णधारपद भुषविता आले नाही. या लेखात अशाच काही खेळाडूंची ओळख आपण करुन घेणार आहोत.
६. जाॅन्टी रोड्स (२४५ वनडे)
दक्षिण आफ्रिकेकडून जाॅन्टी रोड्स १९९२ ते २००३ या काळात खेळला. यात त्याने ५२ कसोटी व २४५ वनडे सामने खेळले. विशेष म्हणजे त्याला वनडे किंवा कसोटी अशा दोन्ही प्रकारात संघाचे एकाही सामन्यात नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही. रोड्स त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे सर्व क्रिकेट जगतात एक लोकप्रिय खेळाडू होता.
५. हर्षेल गिब्ज (२४८ वनडे)
जाॅन्टी रोड्सप्रमाणेच १९९६ ते २०१० या काळात दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख खेळाडू राहिला. या काळात त्याने ९० कसोटी व २४८ वनडे सामने खेळले परंतु यातील एकाही सामन्यात तो संघाचं नेतृत्त्व करुन शकला नाही. त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत आफ्रिकेने वेगवेगळ्या काळात ७ वेगवेगळे कसोटी तर ७ वेगवेगळे वनडे कर्णधार नियुक्त केले होते.
४. ग्लेन मॅकॅग्रा (२५० वनडे)
जगातील एक परिपुर्ण गोलंदाज म्हणून ग्लेन मॅकॅग्राकडे पाहिले जाते. ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने वनडे विश्वचषकात अनेक वेळा जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु समकालीन संघातील जबरदस्त कर्णधारांमुळे मॅकॅग्राला कधीही कर्णधार होता आले नाही. १९९३ ते २००७ या काळात मॅकॅग्राने १२४ कसोटी,२५० वनडे व २ टी२० सामने खेळले. यात त्याने ५ वेगवेगळे कसोटी, ७ वेगवेगळे वनडेत तर १ टी२० कर्णधार पाहिला. परंतु त्यालाही तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपद भुषविता आले नाही.
३. इजाज अहमद (२५० वनडे)
पाकिस्तानचा महान फलंदाज इजाज अहमदने १९८६ ते २००१ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यात त्यांनी ६० कसोटी व २५० वनडे सामने खेळले. त्यांनाही क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात कधीही पाकिस्तान संघाचे नेतृत्त्व करता आले नाही. या काळात पाकिस्तानने ९ वनडे कर्णधार व ९ कसोटी कर्णधार बदलले.
२. युवराज सिंग (३०४ वनडे)
भारतीय संघातील एकेकाळजा एक उत्तम फिनीशर, एक चांगला अष्टपैलू व दर्जेदार क्षेत्ररक्षक राहिलेल्या युवराज सिंगला २००० ते २०१७ अशा १७ वर्षांच्या कारकिर्दीत एकाही सामन्यात देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही.
१७ वर्षांच्या कारकिर्दीत युवीने ३०४ वनडे, ५८ टी२० व ४० कसोटी सामने खेळले. त्याच्या १७ संपुर्ण कारकिर्दीत भारताने तब्बल ११ वनडे कर्णधार, ८ कसोटी कर्णधार व ६ टी२० कर्णधार पाहिले. याच काळात युवराजपेक्षा अनुभवाने कमी असलेले अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांनाही नेतृत्त्वाची संधी मिळाली. शिवाय पाठीमागून आलेले एमएस धोनी व विराट कोहली हे भारताच्या महान कर्णधारांत गणले जाऊ लागले.
१. मुथय्या मुरलीधरन (३५० वनडे)
श्रीलंका काय जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मुथय्या मुरलीधरनकडे पाहिले जाते. वनडेत ५३४ तर कसोटीत ८०० घेत दोन्ही प्रकारात जागतिक विक्रम स्थापन करण्याचा विक्रम मुरलीने केला. आजही तो विक्रम त्याच्याच नावावर आहे. तरीही ३५० वनडे, १३३ कसोटी व १२ टी२० सामन्यात त्याला कधीही संघाचे कर्णधारपद भुषविण्याची संधी मिळाली नाही. ३००पेक्षा जास्त वनडे व १००पेक्षा अधिक कसोटी खेळूनही एकाही सामन्यात नेतृत्त्वाची संधी न मिळालेला तो जगातील एकमेव खेळाडू आहे.
१९९२ ते २०१० या १८ वर्षांच्या कारकिर्दीत श्रीलंकेचे कसोटीत ७, वनडेत १० तर टी२०मध्ये ३ कर्णधार झाले.
गमतीचा भाग म्हणजे मुरलीचा समकालीन क्रिकेटर चामिंडा वासच्या नावावरही हा विक्रम झाला असता. त्याने श्रीलंकेकडून १११ कसोटी, ३२२ वनडे व ६ टी२० सामने खेळले. यातील एका वनडे सामन्यात २००६मध्ये त्याला संघाचे नेतृत्त्व करता आले. नाहीतर या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचं नाव चामिंडाचचं असतं.
आकडेवारीवर आधारीत काही मनोरंजक लेख-
–टाॅप ५- वयाची २३ वर्ष पुर्ण करण्यापुर्वीच कसोटी कर्णधार झालेले खेळाडू
–सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे ५ कर्णधार
–टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले दिग्गज
–टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी
–सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच
–टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब
–टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू