पुणे। पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने 35 वर्षावरील आणि 75 वर्षे आणि त्यावरील वरिष्ठ टेनिस खेळाडूंसाठी नव्या टेनिस मालिकेचे आयोजन करण्यात आले असून या मालिकेला 27 सप्टेंबर 2019 पासून सुरुवात होणार आहे.
पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, डिसेंबरपर्यंत सात टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून ही मालिका स्पर्धा पीएमडीटीए-पीसीएलटीए वरिष्ठ टेनिस मालिका स्पर्धा या नावाने घेण्यात येणार आहे. तसेच, या स्पर्धेला पिंपरी चिंचवड लॉन टेनिस अकादमीचे नंदकुमार रोकडे यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये हिमांशु गोसावी(चेअरमन), मंदार वाकणकर, संग्राम चाफेकर, अजय कामत, केदार शहा, नंदकुमार रोकडे, आश्विन गिरमे, समीर भांबरे यांचा समावेश आहे.
या नव्या वरिष्ठ मालिका स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यांतील वरिष्ठ खेळाडूंना गुण व वार्षिक मानांकन देण्यात येणार आहे आणि 2020 मध्ये पीएमडीटीए तर्फे पहिल्या वरिष्ठ टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये लिलावासाठी वरिष्ठ मानांकित खेळाडूंचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच, जर एखादा खेळाडू पीएमडीटीए अनाधिकृत स्पर्धांमध्ये खेळणार असेल, तर त्याचे मानांकन हे आंतरक्लब अथवा वरिष्ठ टेनिस लीगसाठी ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे ताम्हाणे यांनी नमूद केले.
प्रत्येक स्पर्धेत खेळाडूंना हॉस्पिटॅलिटी व्यतिरिक्त रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहे. शशी वैद्य आंतरक्लब अजिंक्यपद स्पर्धेतील वरिष्ठ खेळाडूंचा सहभाग वाढत असून 45हुन अधिक क्लब यामध्ये आपला सहभाग नोंदवितात. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंसाठी अधिकाधिक स्पर्धांचे आयोजन करण्यास आम्ही उत्सुक असून पुणे टेनिसमध्ये अधिक मजबूत करण्याशिवाय आमच्या कुमार स्तरावरील स्पर्धांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या पाठिंब्याचा आम्ही उपयोग करू, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय पीसीएलटीए येथे 19 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत पीएमडीटीए वरिष्ठ मानांकन टेनिस स्पर्धा, 2 ते 5नोव्हेंबरमध्ये पीएमडीटीए अरुण वाकणकर मेमोरियल वरिष्ठ मानांकन टेनिस स्पर्धा, फर्ग्युसन कॉलेज येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर आणि 7 व 8 डिसेंबर या दोन आठवड्यात संग्राम चाफेकर आयोजित पीएमडीटीए-पीसीएलटीए वरिष्ठ मानांकन टेनिस स्पर्धा, बाउंस टेनिस अकादमी येथे 14 ते 15 डिसेंबर आणि 21 व 22 डिसेंबर या कालावधीत केदार शहा आयोजित पीएमडीटीए-पीसीएलटीए वरिष्ठ मानांकन टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. अरुण साने मेमोरियल आणि शशी वैद्य आंतरक्लब टेनिस स्पर्धेचे जानेवारी ते मार्च 2020मध्ये आयोजन करण्यात आले असून त्यानंतर पीएमडीटीएचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.