पुणे: दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अॅकॅडमीतर्फे एकदिवसीय अश्वारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक २६ मे रोजी सकाळी ८ वाजता, सदाशिव पेठेतील स्काउट ग्राऊंड मैदानावर ही स्पर्धा होणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील ४० पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेतून यावर्षी आॅगस्टमध्ये बँगलोर येथे होणाºया इक्वेस्ट्रीअन प्रिमीअर लीग या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणार आहे, अशी माहिती दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अॅकॅडमीचे गुणेश पुरंदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शो जंपिंग, हॅक्स, पोलबेंडिंग, फॉल्ट अॅन्ड आउट, ड्रसाज, , पोल बेंडिंग या प्रकारात स्पर्धा होणार आहे. तसेच स्पर्धेच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता जिलेबी रेस व जिमखाना ईव्हेंटस होणार असून शो जम्प आणि टेंट पेगींग याचे प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना मेडल्स आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. तसेच सर्वाधिक गुण मिळविणाºया रायडरला पूनावाला ट्रॉफी देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ८ वाजता होणार असून, यावेळी महापौर मुक्ता टिळक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जगदीश कदम यावेळी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी पालकमंत्री गिरीष बापट, हॉकीचे प्रशिक्षक आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त अजित लाक्रा, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, सुनील केंद्रेकर, नरेंद्र पाटील, धनराज घोगरे नगरसेवक हेमंत रासने, गायत्री खडके, राजेश येनपुरे, विरु खोमणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.