टी20 विश्वचषक सुरू होण्यास आता फक्त 50 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. मात्र भारताच्या अडचणीत वाढ होत आहे. एकीकडे भारत निरनिराळे प्रयोग करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे संघातील मुख्य खेळाडूंचा फॉर्म डोकेदुखी बनत चालला आहे. भारतीय संघ सध्या आशिया चषक (Asia Cup) 2022 स्पर्धेत खेळत आहे. यामधील सलग दोन सामने जिंकत भारत सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. सामने जिंकले असले तरी एका खेळाडूची निराशाजनक कामगिरी चिंतेचा विषय ठरत आहे.
विराट फॉर्ममध्ये रिटर्न
आशिया चषक सुरू होण्यापूर्वी सर्वांच्या नजरा विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर खिळल्या होत्या. तो फॉर्ममध्ये परततो का नाही याची चाहते वाट पाहत होते. त्यानेही सर्वांचाच विश्वास कायम राखत पाकिस्तान आणि हाँगकाँग विरुद्ध मोठ्या आणि महत्वाच्या खेळ्या केल्या. मात्र संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी झाला आहे. त्याने हाँगकाँग विरुद्ध 13 चेंडूत 21 धावा करताच विकेट गमावली. तर त्याच्याआधी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही तो 12 धावा करत बाद झाला होता.
रोहितची आतापर्यंतची 2022मधील आंतरराष्ट्रीय टी20तील कामगिरी
रोहितने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये चार शतके केली आहेत. तसेच तो संघाला एकहाती विजय मिळवून देण्यातही मागे नाही. मात्र काही दिवसांपासून त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाही. त्याची 2022मधील कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्याची आकडेवारी पाहिली तर त्याने 15 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 23 सरासरी आणि 135च्या स्ट्राइक रेटने 323 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकदाच अर्धशतक केले आहे. त्याने 29 जुलैला वेस्ट इंडिज विरुद्ध 64 धावा केल्या होत्या. त्यानंतर तो सलग 5 सामन्यांत मोठी खेळी करू शकला नाही.
विराटची आतापर्यंतची 2022मधील आंतरराष्ट्रीय टी20तील कामगिरी
विराटने 2022मध्ये सहा सामने खेळले आहेत. यामध्ये दोन अर्धशतके करताना 175 धावा केल्या आहेत. यातील 94 धावा त्याने आशिया चषकातील दोन सामन्यातं केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 35 आणि स्ट्राईक रेट 124 राहिला आहेत.
भारताला आगामी टी20 विश्वचषकात चांगली कामगिरी करायची असेल तर वरच्या फळीतील खेळाडूंनी धावांचा रतीब घालणे अत्यावशक आहे. टी20 विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अल्टिमेट खो खो स्पर्धेत राजस्थान वॉरियर्सला नमवून गुजरात जायंट्सचा विजयी समारोप
“राहुलला बाहेर काढायचे का?” सूर्याचा पत्रकाराला प्रतिप्रश्न; वाचा काय म्हणाला नवा मि. 360
सहा वर्षानंतर दिल्या सहा धावा! हाँगकाँग विरुद्ध विराट कोहलीची भन्नाट बॉलिंग