दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाचे परिणाम क्रिकेट उमटताना दिसू लागले आहेत. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएलवरही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत.
या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या तीन खेळाडूंना दोषी ठरवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे बीसीसीआयनेही लगेचच वॉर्नर आणि स्मिथच्या आयपीएल सहभागावरही बंदी घातली आहे.
आयपीएलमध्ये स्मिथ राजस्थान रॉयल्स संघाचा आणि वॉर्नर सनरायझर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार होता. पण चेंडू छेडछाड प्रकरणानंतर स्मिथने लगेचच राजस्थान संघाचे कर्णधारपद सोडले होते. तसेच वॉर्नरने आज हैद्राबाद संघाचे कर्णधारपद सोडले.
राजस्थानने स्मिथने कर्णधारपदाची राजीनामा दिल्यानंतर अजिंक्य राहणेकडे कर्णधारपद सोपवले आहे. पण हैद्राबाद संघाने अजूनतरी नवीन कर्णधाराची कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे हैद्राबादच्या नेतृत्वाच्या शर्यतीत भारतीय सलामीवीर शिखर धवन आणि न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन यांची नावे आघाडीवर आहेत.
त्यामुळे जर शिखर या संघाचा कर्णधार झाला तर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व संघांचे कर्णधार भारतीय असतील. कारण फक्त राजस्थान आणि हैद्राबाद संघांव्यतिरिक्त सर्व संघांचे कर्णधार भारतीय होते. पण राजस्थाननेही रहाणेला कर्णधार केले आहे. त्यामुळे आता हैद्राबादचा नवीन कर्णधार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
7 एप्रिल पासून आयपीएलच्या सामन्यांना सुरूवात होत आहे. पहिला सामना मुबंई इंडीयन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे.
आयपीएल संघ आणि कर्णधार
1) मुबंई इंडीयन्स – रोहीत शर्मा
2) चेन्नई सुपरकिंग्ज – एमएस धोनी
3) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली
4) राजस्थान रॉयल – अजिंक्य रहाणे
5) कलकत्ता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक
6) किंग्ज इलेवन पंजाब – आर अश्विन
7) दिल्ली डेयरडेविल्स – गौतम गंभीर
8) सनरायजर्स हैजराबाद – ?