भवानीमाता, श्री संस्कृती, शिवप्रेरणा, जय ब्राह्मणदेव यांनी प्रताप क्रीडा मंडळ आयोजित “स्व. गीताश्री गणेश चव्हाण” चषकाच्या कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्रभादेवी येथील राजाराम साळवी उद्यानातील क्रीडांगणावर झालेल्या सामन्यात भवानीमाताने गणेशकृपाचा ३९-१६ असा पाडाव केला.
कल्पेश पवार, चेतन साळवी यांच्या पल्लेदार चढाईच्या जोरावर भवनीमाताने पहिल्या डावातच दोन लोण देत २३-०५अशी भक्कम आघाडी घेतली. यात चेतनने एकदा एकाच चढाईत ३गडी टिपले.
गणेशकृपाच्या किरण उंडेने दुसऱ्या डावात एकाच चढाईत ४गडी टिपत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण ५वेळा त्यांचे चढाईपट्टू अव्वल पकडीच्या जाळ्यात अडकले. म्हणून त्यांना २३गुणांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
दुसऱ्या सामन्यात श्री संस्कृतीने प्रॉमिसला ३६-२४ असे नमवित आगेकूच केली.मध्यांतराला १७-१०अशी विजयी संघाकडे आघाडी होती. गणेश पिलाने यांच्या अष्टपैलू खेळाला या विजयाचे श्रेय जाते. प्रॉमिसच्या विक्रम गोलतकरने एकाच चढाईत ३गडी टिपत सामन्यात चुरस निर्माण केली, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो कमी पडला.
शिवप्रेरणाने जय खापरेश्वरवर ३१-१४अशी मात केली. शिवप्रेरणाने पूर्वार्धात एक लोण देत १३-०७ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत विजयावर शिक्कामोर्तब केले. केतन वेल्ले, अनंत पंडव यांच्या आक्रमक चढाया त्याला शैलेश भुरवणेची मिळालेली पकडीची साथ यामुळे हा विजय मिळाला. जय खापरीदेवकडून अजिंक्य ढमाले, सचिन चौगुले बरे खेळले.
शेवटच्या सामन्यात जय ब्राम्हणदेवने बालमित्रचा ३६-२४असा पराभव केला. अर्जुन हिंगुलेच्या झंजावाती चढाया त्याला मिळालेली साईनाथ मोहितेची पकडीची साथ यामुळे हा विजय शक्य झाला. अर्जुनने एकदा एकाच चढाईत ३गडी टिपण्याचा पराक्रम केला. ब्राम्हणदेवने पूर्ण डावात दोन लोण चढविले. बालमित्रला एकाही लोणची नोंद करता आली नाही. त्यांचा प्रवीण येवले बऱ्यापैकी खेळला.