प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (२१ जानेवारी) उत्तरेतील दोन संघ दबंग दिल्ली हरियाणा स्टीलर्स आमनेसामने आले. नवीन कुमार च्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या दबंग दिल्ली साठी हा सामना अटीतटीचा होणार होता. अपेक्षेप्रमाणे रंगलेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी दिल्लीचा कर्णधार मनजित छिल्लरने केलेल्या अतातायीपणामुळे दिल्लीला पराभवास सामोरे जावे लागले.
प्रमुख रेडर नवीन कुमार त्याच्या अनुपस्थितीत खेळताना दिल्लीचा चढाई विभाग काहीसा अनुनभवी होता. मात्र, वरिष्ठ अष्टपैलू संदीप नरवाल याने जबाबदारी घेत विजय मलिकला साथ दिली. असे असले तरी, हरियाणा संघ पहिल्या हाफमध्ये वर्चस्व गाजवताना दिसला. विकास कंडोला व विनय यांनी रेडींगमध्ये अनुक्रमे ६ व ५ गुण घेत संघाला १९-११ अशी आघाडी मिळवून दिली होती.
दुसऱ्या हाफमध्ये दिल्लीने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी सातत्याने गुण घेणे सुरू ठेवले. दुसऱ्या हाफच्या दहाव्या मिनिटात दिल्लीला हरियाणा संघाला ऑल आउट करण्यात यश आले. त्यावेळी, हरियाणा संघाकडे केवळ तीन गुणांची आघाडी उरली होती. अखेरच्या तीन मिनिटात सामना बरोबरीत आला होता. मात्र, दिल्लीचा कर्णधार मनजीत छिल्लरचा आक्रमक खेळासाठी अखेरच्या दोन मिनिटात निलंबित केल्याचा फायदा हरियाणा संघाला झाला. त्यानंतर हरियाणाने सामन्यामध् ३६-३३ असा विजय मिळवला.