बंगळुरू। शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) प्रो कबड्डी लीगचा आठवा (Pro Kabaddi 8) हंगाम संपला. आठव्या हंगामाचे विजेतेपद जोगिंदर नरवालच्या नेतृत्त्वातील दबंग दिल्लीने (Dabang Delhi K.C) जिंकले. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात दबंग दिल्लीने तीन वेळच्या विजेत्या पटना पायरेट्सला (Patna Pirates) पराभूत केले आणि विजेतेपदाला गवसणी घातली. दबंग दिल्लीचे हे प्रो कबड्डीचे पहिलेच विजेतेपद आहे. दबंग दिल्लीने ३७-३६ अशा फरकाने पटनाला अंतिम सामन्यात पराभूत केले.
या संपूर्ण हंगामात रेडर्स आणि डिफेंडर्स या दोघांचेही जवळपास सारखेच वर्चस्व राहिल्याचे दिसून आले. केवळ चार रेडर्स यंदा २०० पाँइंट्सचा टप्पा पार करू शकले, तर एकाही डिफेंडर खेळाडूला १०० पाँइंट्स मिळवता आले नाही.
आठव्या हंगामातील यशस्वी रेडर्स
प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात रेडर्समध्ये बंगळुरू बुल्सचा कर्णधार पवन शेरावतचे वर्चस्व पाहायला मिळाले. केवळ त्यालाच या हंगामात ३०० पेक्षा अधिक रेड पाँइंट्स मिळवता आले. तसेच या हंगामात २०० पेक्षा अधिक रेड पाँइंट्स शेरावतसह चार खेळाडूंनी मिळवले. यात अर्जून देशवाल (२६७), मनिंदर सिंग (२६२) आणि नवीन कुमार (२०७) यांचा समावेश आहे. तसेच सर्वाधिक रेड पाँइंट्स मिळवणाऱ्या रेडर्समध्ये युपी योद्धाचा सुरिंदर गिल पाचव्या क्रमांकावर राहिला (Top 5 Raiders PKL 8).
प्रो कबड्डी ८ मध्ये सर्वाधिक रेड पाँइंट्स मिळवणारे रेडर्स
३०४ पाँइंट्स – पवन शेरावत (बंगळुरू बुल्स)
२६७ पाँइंट्स – अर्जून देशवाल (जयपूर पिंक पँथर्स)
२६२ पाँइंट्स – मनिंदर सिंग (बंगाल वॉरियर्स)
२०७ पाँइंट्स – नवीन कुमार (दबंग दिल्ली)
१८९ पाँइंट्स – सुरिंदर गिल (युपी योद्धा)
आठव्या हंगामातील यशस्वी डिफेंडर्स
प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात कोणत्याही डिफेंडरला १०० टॅकल पाँइंट्स मिळवता आले नसले, तरी त्यांचे वर्चस्व दिसून आले. या हंगामात सर्वाधिक टॅकल पाँइंट्स मिळवले ते पटना पायरेट्सच्या मोहम्मदरेझा शादलू याने. त्याने २४ सामन्यांत ८९ टॅकल पाँइंट्स मिळवले. तसेच दुसऱ्या क्रमांकावर ८२ टॅकल पाँइंट्ससह तमिळ थलायवाजचा सागर आहे. प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात सर्वाधिक टॅकल पाँइंट्स मिळवणाऱ्या डिफेंडर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ६९ पाँइंट्सह सौरभ नंदाल आहे, तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे जयदीप आणि सुमीत आहे (Top 5 Defenders PKL 8).
प्रो कबड्डी ८ मध्ये सर्वाधिक टॅकल पाँइंट्स मिळवणारे डिफेंडर्स
८९ पाँइंट्स – मोहम्मदरेझा शादलू (पटना पायरेट्स)
८२ पाँइंट्स – सागर (तमिळ थलायवाज)
६९ पाँइंट्स – सौरभ नंदाल (बंगळुरू बुल्स)
६६ पाँइंट्स – जयदीप (हरियाणा स्टिलर्स)
६२ पाँइंट्स – सुमीत (युपी योद्धा)
महत्त्वाच्या बातम्या –
दबंग दिल्लीने पहिल्यांदाच जिंकले प्रो कबड्डीचे विजेतेपद, पाहा आत्तापर्यंतचे विजेते आणि उपविजेते संघ
प्रो कबड्डी फायनल : पाटना पायरेट्सला लोळवत दबंग दिल्ली विजयी, प्रथमच पटकावले विजेतेपद