भारतीय कसोटी संघाची नवी द वॉल म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. त्यामुळे अनेकांनी त्याच्या संघातील स्थानावर प्रशचिन्ह उभे केले आहे. ४ ऑगस्टपासून भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपुर्वी माजी भारतीय कसोटी फलंदाज सुनील गावस्कर यांनी चेतेश्वर पुजाराला पाठिंबा दिला आहे. परंतु यावेळी त्यांनी काहीशी संमिश्र प्रतिक्रिया देत त्याचे समर्थन केले आहे.
जर भारतीय संघाला असे वाटत असेल की, पुजाराची खेळण्याची शैली कार्य करत नसेल; तर त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूला आजमावले जावे. आपल्या मजबूत बचाव आणि तंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराला अलीकडच्या काळात खराब चेंडूवर धावा न केल्यामुळे टिकेला सामोरे जावे लागले आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यातील खराब कामगिरीनंतरही त्याला टिकेला सामोरे जावे लागले होते.
सोमवारी (०२ ऑगस्ट) एका आभासी पत्रकार परिषदेदरम्यान सुनील गावस्कर म्हणाले, “एका विशिष्ट पद्धतीने खेळल्यामुळे पुजारा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. त्याला त्या पद्धतीवर विश्वास ठेवावा लागेल. जर संघ त्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवत नसेल; तर ते दुसर्या खेळाडूचा विचार करू शकतात. मात्र, ही पद्धत त्याच्यासाठी काम करते. भारतीय संघासाठीही ती फायदेशीर ठरली आहे. तो एका टोकावर खंबीरपणे उभा राहतो. म्हणून खेळाडूला दुसऱ्या टोकाला शॉट खेळण्याची संधी असते. कारण त्या खेळाडूला माहित असते की, एका टोकाला पुजारासारखा मजबूत खेळाडू उभा आहे.”
“मला वाटते की, त्याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि त्याला सर्वोत्तम वाटेल त्याप्रमाणे खेळत राहावे लागेल. कारण वर्षानुवर्षे त्याने भारतासाठी अद्भुत कामगिरी केली आहे,” असेही ते म्हणाले.
त्याचवेळी भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणात म्हणाला, “पुजारा सध्या ज्या टप्प्यातून जात आहे, त्याबद्दल त्याला कल्पना असेल यात शंका नाही. जोपर्यंत तो मोठी अर्धशतके किंवा शतके झळकावत नाही. तोपर्यंत तो टीकाकारांची तोंड बंद करू शकणार नाही. पुजाराकडून आपण तिसऱ्या क्रमांकावर खूप अपेक्षा करतो. कारण दोन्ही सलामीवीरांसोबत हे खूप महत्वाचे स्थान आहे.”
लक्ष्मण यांचा असा विश्वास आहे की, जर पुजारा राहुल द्रविडच्या कामगिरीची नक्कल करू शकला; तर भारत सहज कसोटी मालिका जिंकेल. मात्र, सध्याच्या काळात पुजाराची कामगिरी पाहता तो द्रविडची नक्कल करू शकेल की नाही? हे सांगणे कठीण आहे.
महत्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मशी झगडत असलेल्या रहाणेला मिळाला गुरुमंत्र, ‘ही’ चूक सुधारल्यास पाडेल धावांचा पाऊस
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली बनू शकतो ‘विक्रमांचा बादशाह’, वाचा सविस्तर
भारत विरुद्ध इंग्लंड कोण जिंकणार मालिका?, दोन इंग्लिश कर्णधारांनी दिले ‘हे’ उत्तर