बंगळूरु। अमरजित सिंग (13 गुण) व वेंकटेशा (11 गुण) यांच्या आक्रमक चढायांमुळे इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेतील पहिल्या उपांत्यसामन्यात पुणे प्राईड संघाने चेन्नई चॅलेंजर्स संघावर 39-34 असा विजय मिळवला व अंतिम फेरीत धडक मारली. पुण्याकडून जितेंदर यादव व संदीप खरब यांनी बचावात चमक दाखवली.
बंगळूरु येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या उपांत्यसामन्यात चेन्नई चॅलेंजर्स संघाविरुद्ध खेळताना पुणे प्राईड संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये आक्रमक सुरुवात केली. अमरजित सिंगच्या चढाईमुळे पुणे प्राईड संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये 14-6 अशी आघाडी घेतली. दुस-या क्वॉर्टरमध्ये चेन्नई चॅलेंजर्सचा चढाईपटू इलायाराजाने आक्रमक खेळ करत गुणांची कमाई केली व दुसरे क्वॉर्टर 9-6 असे चेन्नईच्या नावे केले. पण, पहिल्या क्वॉर्टरमधील आघाडीच्या जोरावर पुणे प्राईड संघाने मध्यंतरापर्यंत 20-15 अशी आघाडी घेतली.
तिस-या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा चुरस पहायला मिळाली. पुण्याच्या संघासमोर आघाडी भक्कम करण्याचे आव्हान होते.पण,चेन्नई संघाकडून इलायाराजाने आक्रमक खेळ करत गुणांची कमाई केली व तिसरे क्वॉर्टर 14-4 असे चेन्नईच्या नावे करत संघाला 29-24 अशी आघाडी मिळवून दिली. पुणे प्राईड संघाने शेवटच्या क्वॉर्टरमध्ये आपला खेळ उंचावला. त्यांच्या अमरजित सिंग व वेंकटेशा यांनी चढाईत चमक दाखवली. त्यांना बचावफळीने देखील चांगली साथ दिली. चौथे क्वॉर्टर 15-5 असे पुण्याच्या संघाने आपल्या नावे करत सामना जिंकला.
सामन्यांचे थेट प्रक्षेपण – डी स्पोर्ट्स, डी डी स्पोर्ट्स, एमटीव्ही आणि एमटीव्ही एचडी प्लसवर 8.00 वाजल्यापासून