पुणे । महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींसाठी अतिशय मान उंचावणारी गोष्ट गेल्या आठवड्यात घडली. पुण्याचा कबड्डीपटू मोबीन शेखची नेपाळ येथे २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर ,२०१७ रोजी होणाऱ्या चार देशाचं निमंत्रित आंतराष्ट्रीय मैत्रीपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली.
या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होणारा तो महाराष्ट्रामधील एकमेव खेळाडू आहे. त्याच्या राष्ट्रीय संघातील निवडीबद्दल पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक बाबुराव चांदेरे व सदस्य सागर खळदकर यांनी आनंद व्यक्त केला.
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, पुणेचे सदस्य सागर खळदकर म्हणाले, ” मोबीन शेखची भारतीय कबड्डी संघात निवड होणे ही बाब महाराष्ट्र व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनसाठी अभिमानस्पद आहे तरी त्याने खेळासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. त्याला व भारतीय कबड्डी संघाला शुभेच्छा.”
मोबीनचे अनेक वर्ष प्रशिक्षक असलेल्या भगवान सोनवणे सर यांनी महा स्पोर्ट्सशी बोलताना अनेक वर्ष त्यावर झालेला अन्याय दूर झाल्याचे मत व्यक्त केले.
ते म्हणतात, ” मोबीन आशियायी स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे. त्याने शालेय राष्ट्रीय स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. मी त्याला शालेय जीवनापासून ओळखतो. खायचे वांदे असलेला आणि अतिशय बिकट परिस्थितीतून पुढे आलेला हा खेळाडू आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी जात आहे याचा खूप आनंद होत आहे. “
मोबीन बद्दल पुढे बोलताना ते म्हणतात,” त्याला आजपर्यँत अनेक अडचणी आल्या आहेत. परंतु त्याने जिद्द सोडली नाही. तो पिंपरी शहरात भावाकडे राहून सराव करतो. खेळाच्या जोरावर त्याने आयकर विभागात नोकरी मिळवली आहे.”
प्रो-कबड्डीने नाकारलं परंतु थेट झाली राष्ट्रीय संघात निवड:
२०१७ च्या प्रो कबड्डी लिलावात या खेळाडूला कोणत्याही संघाने घेतले नाही. मोबीनचे वय २५ असल्यामुळे तो २३ वयाच्या खेळाडूंच्या गटातही प्रो कबड्डीमध्ये बसत नव्हता. परंतु त्याच्या आतंरराष्ट्रीय स्थरावरील कामगिरीचा त्याला प्रो कबड्डीच्या पुढच्या मोसमात निवडीसाठी नक्कीच फायदा होईल.