पुणे । स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशन व पुणे महानगरपालिकेतर्फे पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. दिग्विजय हॉर्स रायडिंग अॅकॅडमी, शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव येथे दिनांक १६ ते १९ फेब्रुवारी २०२० दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये पाच गट करण्यात आले असून राज्यभरातील ९ संघातील १६० खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनचे सेक्रेटरी आणि मुख्य संयोजक गुणेश पुरंदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला विनायक हळबे, कर्नल संजय बोरसे (निवृत्त), जगदीश कदम, नरेंद्र पाटील, प्रमोद मोहिते आदी उपस्थित होते.
अकलूज, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, मुंबई आणि पुणे अशा विविध भागांतील स्पर्धेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेत वय वर्षे १० ते १२, १२ ते १४, १४ ते १६, १६ ते २० आणि २१ पासून पुणे अशा पाच गटांमध्ये स्पर्धक सहभागी होणार आहेत. अश्वारोहणातील ड्रसाज, शो-जंपिंग, टेंट पेगिंग आणि जिमखाना इव्हेंटस् अशा चार प्रकारांत ही स्पर्धा होणार आहे. अश्वारोहण स्पर्धाला प्रवेश शुल्क नसून स्पर्धकांची राहणे व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली आहे. सकाळी ७ ते १० आणि दुपारी ४ ते रात्री ८ यावेळेत स्पर्धा होणार आहेत.
संयोजक विनायक हळबे म्हणाले, विजेत्या संघाला पुणे महापौर चषक प्रदान करण्यात येणार आहे. तर ड्रसाज, शो-जंपिंग, टेंट पेगिंग प्रकारात विजेत्यांना रोख १ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यातील विविध भागांतून स्पर्धक येणार असल्याने अश्वारोहणातील कौशल्य पाहण्याची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. स्पर्धेचे औपचारिक उद््घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. अश्वारोहणातील चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण देखील यावेळी होणार आहे.