पुणे । ‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’ ही भारतातील सर्वात मोठी संस्था आहे. सामाजिक स्तरावर पुणे रनिंगच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. संस्थे अंतर्गत ‘लास्ट संडे ऑफ मंथ’ (LSoM) च्या वतीने महिन्यातील शेवटच्या रविवारी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. या मॅरेथॉनद्वारे काही सामाजिक संदेश देण्यात येतात. या महिन्याचा शेवटचा रविवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित मॅरेथॉन ‘वुई आर सपोर्टींग ट्रान्सजेंडर’ या संकल्पनेवर आधारित आहे.
ही मॅरेथॉन रमणबाग शाळा, शनिवार पेठ येथून सुरु होईल. सरासरी १५०० ते १८०० जण या मॅरेथॉन मध्ये सहभागी होतील. मॅरेथॉन धावणे अंतराची श्रेणी ३ कीमी, ५ कीमी, आणि १० कीमी असेल. प्रत्येक महिन्यातील मॅरेथानसाठी वेगवेगळा धावणारा गट पुढाकार घेत असतो.या मॅरेथॉन चे ‘पेठ ग्रुप’ नेतृत्व करेल. सरिता राठी ‘पेठ ग्रुप’ च्या गटनेत्या असतील, अशी माहिती सुधिंद्र हरिभट (पुणे रनिंग, अध्यक्ष) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी lsom.in या लिंकवर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य आहे. १९ फेब्रुवारी हा नोंदणी साठी अंतिम दिनांक आहे. शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत अथवा रविवारी फ्लॅग ऑफ होण्याच्या एक तास अगोदर ‘बिब’ चे वितरण रमणबाग शाळेत करण्यात येईल. फ्लॅग ऑफ ची वेळ १० किमी साठी सकाळी ५.४५ राहील तर ५ किमी आणि ३ किमीसाठी सकाळी ६.१५ असे असेल. तृतीयपंथी संतोषी कदम आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुजा व अनुराधा वाघोलीकर यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात येणार आहेत.
सुधींद्र हरिभट (अध्यक्ष, ‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’), सरिता राठी ( LSoM, पेठ गट नेता), मिलिंद वाणी (अध्यक्ष, LSoM मॅरेथॉन), जनार्दन रणदिवे (अध्यक्ष, पुणे पीपल्स को-ऑप बँक), ‘अॅपलॉड’ एनजीओ ( तृतीयपंथीयांच्या समस्या निराकरणसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था) च्या अनुजा वाघोलीकर आणि अनुराधा वाघोलीकर तसेच तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या सोनाली दळवी यांच्या समवेत तृतीयपंथी संतोषी कदम उपस्थित होते.
जास्तीत जास्त नागरिकांमध्ये व्यायामाविषयी जागृती निर्माण होऊन धावपळीच्या जीवनात व्यायाम हा एक दैनंदिनी बनविणे या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमाचे प्रायोजक पुणे पीपल्स को-ऑप बँक लि. असून, मीडिया पार्टनर 95 बिग एफएम आहे, अशी माहिती मिलिंद वाणी यांनी दिली.
‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’ वर्षभरात विविध सामाजिक सत्रांचे आयोजन करते. यामध्ये धावणे, योग, स्ट्रेंथ ट्रेनींग यांचा समावेश आहे. ही सर्व सत्रे विनामूल्य असतात. देशातील विविध शहरांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविले जाऊ लागले आहेत.
विविध उपक्रमाच्या सत्रांच्या अनोख्या पद्धती, उत्साही स्वयंसेवक-प्रशिक्षकांच्या माध्यमातून पुणे रनिंगने आधुनिक समाजात धावण्याचे आणि तंदुरुस्तीचे रूप बदलले आहे, असे जनार्दन रणदिवे (अध्यक्ष, पुणे पीपल्स को-ऑप बँक) म्हणाले.
पुणे येथील ‘अॅपलॉड’ ही स्वयंसेवी संस्था तृतीयपंथीयांना सक्षम करणे, प्रेरणा देणे आणि त्यांना सामान्य जीवन जगण्यास मदत करणे यासाठी कार्यरत आहे. ‘पुणे रनिंग’ च्या या मॅरेथॉनच्या संकल्पनेमुळे ‘तृतीयपंथीबद्दल भेदभाव करण्याऐवजी त्यांना सामाजिकरित्या स्वीकारू या आणि त्यांनाही आपल्या समाजाचा भाग बनवू’ असा संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे, असे अनुजा वाघोलीकर आणि अनुराधा वाघोलीकर यांनी सांगितले.
अत्यंत दुर्लक्षित आणि गैरसमज अशा वातावरणात वावरणारा तृतीयपंथी समाज हा दुर्लक्षित समुदाय आहे. त्यामुळे अशा समाजाला काही मदत करता यावी या हेतूने या मॅरेथॉनची संकल्पना ‘वुई आर सपोर्टींग ट्रान्सजेंडर’ ही आहे, असे सरिता राठी पत्रकार परिषदेत म्हणाल्या.