पुणे। जॉय स्टोन मेटल इंडस्ट्रीज आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे शहरात एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे 2 ते 8 मे 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. शहरात 10 वर्षाच्या कालावधीनंतर वरिष्ठ आयटीएफ टेनिस स्पर्धेत आयोजन होत असून ही स्पर्धा एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत आहे. या स्पर्धेला आर्यन पम्प्स यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेत देशभरातून 200 हुन खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून ही स्पर्धा 35 वर्षांवरील, 40 वर्षांवरील, 45वर्षांवरील, 55वर्षांवरील, 60 वर्षांवरील, 65 वर्षांवरील, 70 वर्षांवरील पुरुष गटात, तर 35 व 45 वर्षावरील महिला गटात पार पडणार असल्याची माहिती स्पर्धा संचालक सुंदर अय्यर आणि डीएस रामा राव यांनी दिली.
नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या एस400 स्पर्धेनंतर होणारी भारतात होणारी ही दुसरी उच्च दर्जाची स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आयटीएफ गुण मिळवण्याची व आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, या स्पर्धेत भारतातील अनेक अव्वल माजी टेनिसपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. आयटीएफ वरिष्ठ सर्किटला देशातुन मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जानेवारी ते जून 2022 या कालावधीत 13 आयटीएफ जागतिक मानांकन टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये एस400, एस200 आणि एस100 स्पर्धांचा समावेश असणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले. ,
या वरिष्ठ गटातील स्पर्धांमुळे देशातील टेनिसच्या प्रसारासाठी आणखी मदत मिळणार असून अनेक भागातील वरिष्ठ टेनिसपटूंना पुन्हा टेनिसकडे वळण्याची तसेच, व्यावसायिक टेनिसखेळाडूंना उच्च स्तरावरील स्पर्धा करण्याची आणि आपल्या खेळात व तंदरुस्ती यामध्ये सातत्य राखण्यासाठी मदत मिळणार असल्याचे अय्यर यांनी सांगितले.