प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (2 नोव्हेंबर) तीन सामने खेळले गेले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दिवसातील पहिल्या सामन्यात पटना पायरेट्सने यु मुंबाला 34-31 असे पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात जयपुर पिंक पँथर्सने दबंग दिल्लीला 45-40 अशा फरकाने नमूद सलग सहावा पराभव सोपवला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या पुणेरी पलटणने आपली सलग सहा सामन्यांपासून सुरू असलेली विजयी मालिका कायम राखत युपी योद्धा संघाला 42-38 अशा फरकाने मात दिली.
विजयीरथावर आरूढ असलेल्या यु मुंबाने दिवसातील पहिल्या सामन्यात पटना पायरेट्सचे आव्हान स्वीकारले. आक्रमक अंदाज सुरू झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात एकसारखा खेळ दाखवला. पटनासाठी सचिन तर मुंबईसाठी आशिष सातत्याने गुण घेत होते. मात्र, सामन्याच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये पटनाने आपल्या खेळाचा स्तर उंचावत मुंबईला 34-31 अशी मात दिली.
दिवसातील दुसरा सामना सलग पाच पराभव स्वीकारलेल्या दबंग दिल्ली विरुद्ध गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेल्या जयपूर पिंक पँथर्स यांच्या दरम्यान होता. या सामन्यात दिल्ली विजयाच्या इराद्याने उतरली. मात्र, जयपुरने त्यांना आपल्या भक्कम बचावापुढे जाऊ दिले नाही. नवीन कुमारने शर्थीच प्रयत्न करत दिल्लीचा मोठा पराभव होणार नाही याची खबरदारी घेतली. पूर्ण वेळेनंतर या सामन्यात जयपुरने 45-40 असा विजय संपादन केला.
दिवसातील तिसरा आणि अखेरचा सामना यजमान पुणेरी पलटण व यूपी योद्धा यांच्या दरम्यान खेळला गेला. मागील सहा सामन्यांपासून अपराजित असलेल्या पुणे संघाने पहिल्याच हाफमध्ये आपल्या डिफेन्सच्या जोरावर तब्बल 9 गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला युपीने पुणे संघाला ऑल आउट करत सामना बरोबरीत आणला. मात्र, संपूर्ण हंगामात जबरदस्त खेळ दाखवलेल्या पुणे संघाने त्यातून सावरत पुन्हा आघाडी बनवली. पुणे संघाचा कर्णधार इराणचा फझल अत्राचली प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात यशस्वी डिफेंडर बनला. पूर्ण वेळानंतर पुणे संघाने 40-31 असा विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली.