पुणे: तब्बल ४२१ किलोमीटर सायकलिंग, ८४ किलोमीटर पळणे आणि १० किलोमीटर पोहणे असे क्रीडाप्रकार सलग ३ दिवस करीत पुण्याच्या नवी पेठेतील शुभम काजळे अल्ट्रा मॅन २०१८ ही स्पर्धा पूर्ण करणारा जगातील सर्वात लहान वयाचा खेळाडू बनला आहे.
१२ ते १४ मे दरम्यान ऑस्ट्रेलियातील नूसा येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अल्ट्रा मॅन ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा ३६ तासात पूर्ण करणे बंधनकारक असते. परंतु शुभमने ३१ तास ३२ मिनिटे आणि ७ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली, अशी माहिती प्रशिक्षक गुणेश पुरंदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रशिक्षक कल्पना आगाशे, डॉ. अविजान सिन्हा, शुभमचे पालक संजय काजळे, हेमंत काजळे, ज्योती काजळे उपस्थित होते. जगभरातील ४८ स्पर्धकांपैकी ४४ स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. त्यामध्ये शुभम हा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. नवी पेठेतील रामबाग कॉलनीमध्ये रहात असलेला शुभम स.प.महाविद्यालयात शिकत आहे.
कल्पना आगाशे म्हणाल्या, शारिरीक आणि मानसिक क्षमतेचा कस लावणाºया या स्पर्धेत अतिशय चांगली कामगिरी करीत शुभमने भारताचा तिरंगा आॅस्ट्रेलियात फडकाविला आहे. आतापर्यंत केवळ १२ भारतीय खेळाडूंनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. त्यामुळे शुभमने मिळविलेले हे यश विशेष आहे.
संजय काजळे म्हणाले, यापूर्वी त्याने आॅस्ट्रेलियामध्ये २०१६ या वर्षी आयर्नमॅन, कोल्हापूर अल्ट्रा मॅरेथॉन, चेन्नई हाफ आयर्न ट्रायथलॉन, गोवा ट्रायथलॉन, म्हैसूर हाफ ट्रायथलॉन यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. टिळक तलावावरील प्रशिक्षक कल्पना आगाशे आणि अॅकॅडमीचे गुणेश पुरंदरे, डॉ. अविजान सिन्हा यांचे मार्गदर्शन शुभमला मिळाले.
स्पर्धेविषयी अनुभव सांगताना शुभम म्हणाला, अनेक अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करीत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. स्पर्धेकरीता माझी दोन वर्षांपासून तयारी सुरु होती. २०१६ मध्ये आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केल्यानंतर अल्ट्रा मॅन साठी तयारी सुरु झाली होती. त्यामध्ये मी एका दिवसाआड २ ते ३ तास सायकलिंग, पोहणे आणि १ तास पळणे असा सराव केला. यापुढेही अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेणार असल्याचे त्याने सांगितले.