आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. बीसीसीआयने काल (७ मार्च) या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. देशभरातील एकूण सहा शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. मात्र, आता आयपीएलच्या आयोजनस्थळांवरून वादाला तोंड फुटले आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी तर याबाबत उघड नाराजी व्यक्त केली.
या शहरांमध्ये होणार स्पर्धा
कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील आयपीएल बंद दाराआड खेळवली जाणार आहे. मुंबई, दिल्ली, बेंगलोर, कोलकत्ता, अहमदाबाद व चेन्नई या शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडेल. विशेष म्हणजे यावर्षी कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे बीसीसीआयला पत्र
आयपीएलच्या आयोजनस्थळांची घोषणा झाल्यानंतर, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत बीसीसीआयला पत्र लिहिले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पत्र लिहिताना म्हटले आहे की, ‘मुंबईमध्ये दररोज नऊ हजारापेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडत असताना, मुंबईमध्ये सामने आयोजित करण्यात येत आहेत. असे असताना मोहालीमध्ये सामने का आयोजित केले जाऊ शकत नाहीत? आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ.’
मोहाली येथील फ्रॅंचाईजी पंजाब किंग्स आयपीएलमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे, आगामी आयपीएलमधील काही सामने मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवण्यात यावे, अशी मागणी फ्रॅंचाईजी व राज्य सरकारने केली आहे.
आयपीएल संघांनी केली होती ही मागणी
आयपीएलचे सामने आयोजित करण्यास मिळणार नसल्याने पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलकडे तक्रार केली होती. त्यानंतर, बीसीसीआयने कोणत्याही संघाला घरच्या मैदानाचा फायदा होणार नाही अशा पद्धतीने आयपीएलचे वेळापत्रक आखले आहे. आंध्रप्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद अजहरुद्दिन यांनी देखील आपण हैदराबादमध्ये योग्य ती खबरदारी घेऊन आयपीएलचे सामने आयोजित करू शकतो, असे म्हटलेले.
महत्वाच्या बातम्या:
अगग, लग्नाआधीच जावई प्रेम जगजाहीर! शाहिद-शाहीनचा तो व्हिडिओ भन्नाट व्हायरल, लोक घेतायत मजा
इंग्लंडला पराभवानंतर अजून एक धक्का, हा प्रमुख गोलंदाज टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता