पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, साई प्रणित, किदांबी श्रीकांत करणार भारताचे प्रतिनिधित्व

नवी दिल्ली। जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली चेन युफेई आणि गतविजेता पुरुष एकेरी चॅम्पियन विक्टर अ‍ॅक्सेलसेन हे दहाव्या योनेक्स सनराईस इंडिया ओपन स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधतील. इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियमच्या के डी जाधव इनडोअर हॉलमध्ये 24 ते 29 मार्च दरम्यान स्पर्धा होणार आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची कट ऑफ ही 26 एप्रिलला असल्याने चार लाख अमेरिकन डॉलरच्या या स्पर्धेत अनेक आघाडी बॅडमिंटन स्टार या सुपर 500 इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवताना दिसतील.

युफेई ही महिला एकेरीत जगातील अव्वल दहा खेळाडूंपैकी आठ जणांचे प्रतिनिधित्व करेल. युफेईसोबत अकाने यामागुची, हे बिंगजिआओ, कॅरोलिना मरिन, आन से यंग, मिशेल ली, तीन वेळची चॅम्पियन रॅचनॉक इंटॅनॉन आणि भारताची आघाडीची खेळाडू पी व्ही सिंधूसह सायना नेहवाल या खेळाडू असतील.
पुरुषांमध्ये अ‍ॅक्सेलसेन आपल्या तिस-या जेतेपदासाठी प्रयत्न करेल. त्याला साई प्रणित व 2018 चा विजेता शी युकी चे आव्हान असेल. 2012 चा चॅम्पियन व माजी अव्वल मानांकित खेळाडू सोन वान हो देखील जेतेपदाचा प्रयत्न करेल.तीन वेळचा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन कुणलावुत वितिदसर्न चमक दाखवण्यासाठी सज्ज असेल.

स्पर्धेबाबत बोलताना बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हिमांता बिस्वा सर्मा म्हणाले की, ऑलिम्पिक पात्रता ही प्राथमिकता असल्याने या स्पर्धेत चुरस पहायला मिळेल. त्यामुळे बॅडमिंटन चाहत्यांना सर्वोत्तम खेळाडूंचा खेळ पाहण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळे मी सर्वांना सामने पाहण्यासाठी यावे असे आव्हान करतो.

भारताची 2015 सालची चॅम्पियन सायना नेहवाल व किदांबी श्रीकांत यांसाठी ही स्पर्धा महत्वाची असून काही रँक्ंग गुण मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. 2014 सालचा राष्ट्रकूल सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यप, एच.एस.प्रणॉय, सौरभ वर्मा, समीर वर्मा व लक्ष्य सेन हे भारतीय खेळाडू एकेरीच्या मुख्य फेरीत चमक दाखवतील.

2017 ची चॅम्पियन सिंधूला या स्पर्धेच्या माध्यमातून जगातील दिग्गज खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. तिच्या गटात मलेशिया मास्टर्स जेतेपदाने वर्षाची सुरुवात करणा-या चेन युफेईचे आव्हान असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक स्टार खेळाडूंना आपली क्रमवारी सुधारण्यासोबत यामागुची, इंटॅनॉन, मारिना यांना सिडिंग गुण मिळवण्याची संधी आहे.

ऑलिम्पिक पात्रतेपुर्वी असणारी ही शेवटची स्पर्धा आहे. त्यामुळे योनेक्स सनराईज इंडिया ओपन स्पर्धेत आपल्याला अनेक आघाडीचे खेळाडू खेळताना दिसतील. त्यामुळे दिल्ली येथील स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा असे आयोजक सचिव व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अजय सिंघानिया म्हणाले.

दुहेरीत थायलंड ओपन विजेता सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या जोडीकडे असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडूंनी आपापल्या संघासाठी चमक दाखवली. पुरुष दुहेरीत त्यांच्यासमोर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या ताकेशी कुमारा व केईगो सोनोडा जोडीचे आव्हान असेल.

भारतीय जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी – अश्‍विनी पोनप्पा आणि प्रणव जेरी चोप्रा- सिकी रेड्डी जोडी मिश्र दुहेरीत सहभागी होणार आहेत. या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या झेंग सी वेई व हुआंग या किओंग जोडीचा देखील समावेश आहे. महिला दुहेरी गटात सिकी व अश्‍विनी जोडीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

You might also like