क्रिकेटटॉप बातम्या

“माझ्या मुलाला जबरदस्तीनं निवृत्त करण्यात आलं”, आर अश्विनच्या वडिलांचा धक्कादायक आरोप!

गाबा कसोटीनंतर रविचंद्रन अश्विननं ज्याप्रकारे आपल्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक देण्याची घोषणा केली, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चाहत्यांना अश्विनच्या अशा तडकाफडकी निर्णयाची मुळीच अपेक्षा नव्हती. दरम्यान, अश्विनच्या वडिलांनी एक धक्कादायक दावा केला आहे. आपल्या मुलाला जबरदस्तीनं निवृत्त करण्यात आल्याचं ते म्हणाले.

‘सीएनएन न्यूज 18’ शी बोलताना अश्विनच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाचा सतत अपमान केला जात होता, म्हणूनच कदाचित त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर निवृत्ती जाहीर केली. अश्विनच्या निवृत्तीबाबत मलाही शेवटच्या क्षणी कळलं, असं ते म्हणाले. त्याच्या मनात काय चाललं होतं मला माहित नाही. त्यानं नुकतीच याची घोषणा केली. मीही ते पूर्ण आनंदानं स्वीकारलं. पण मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. एकीकडे त्यानं ज्या प्रकारे निवृत्तीची घोषणा केली त्यामुळे मी खूश होतो. परंतु दुसरीकडे मला हे आवडलं नाही कारण त्यानं खेळत राहायला हवं होतं.

अश्विनच्या वडिलांनी पुढे बोलताना सांगितलं की, “निवृत्तीचा निर्णय हा अश्विनचा होता. मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु त्यानं ज्या पद्धतीनं हा निर्णय घेतला त्यामागे अनेक कारणं असू शकतात. खरं काय ते फक्त अश्विनलाच माहीत आहे. कदाचित अपमानामुळे हे घडलं असावं.”

भारतीय कर्णधार रोहित शर्मानं बुधवारी सांगितलं होतं की, अश्विन गेल्या काही काळापासून निवृत्ती घेण्याचा विचार करत होता. परंतु त्यानं स्वत: त्याला ॲडलेडमधील दिवस-रात्र कसोटी खेळण्याचा सल्ला दिला होता.

यावेळी अश्विनच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांची मुलाच्या कारकिर्दीत विशेष भूमिका नव्हती. ते अश्विनला बाईकवर ट्रेनिंगसाठी सोडत असत. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, “मी त्याला बाईकवर घेऊन जायचो आणि सरावासाठी सोडायचो. मी त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये फारसा गुंतलो नव्हतो. मी त्याला क्रिकेटसोबतच अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगायचो. घरी मी त्याच्याशी बोलायचो, इतकंच. माझ्या मुलानं जे केलं, ते सर्व त्याच्या बळावर केलं.”

हेही वाचा – 

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीची मोठी घोषणा, पुढील दोन विश्वचषकातही बदल
विराट कोहली लवकरच भारत सोडू शकतो, पत्नी अनुष्कासोबत इथे शिफ्ट होणार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर अश्विन आता काय करणार? लवकरच दिसू शकतो या नव्या भूमिकेत!

Related Articles