भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्याच दिवशी द्रविडची एका उत्पादनासाठी केलेली जाहिरात चर्चिली जातेय. या जाहिरातीत मैदानावर नेहमी सभ्य दिसणारा द्रविड अत्यंत रागात दिसतोय. ही जाहिरात चाहत्यांकडून पसंत केली जात असतानाच, द्रविडची आणखी एक जुनी जाहिरात व्हायरल होऊ लागली आहे.
अशी आहे जाहिरात
नव्या जाहिरातीमध्ये द्रविड भर रस्त्यात ‘इंदिरानगर का गुंडा’ असे म्हणत ट्रॅफिकमध्ये तोडफोड करताना दिसत आहे. ‘इंदिरानगर का गुंडा’ हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होतोय. त्याचवेळी, २०१३ मधील राजस्थान रॉयल्स संघात असताना द्रविडने एका पेयासाठी केलेल्या जाहिरातीत संघ सहकाऱ्यांना दिलेल्या जोशपूर्ण भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
‘ड्यू ऑर डाय’ अशा आशयाच्या या जाहिरातीत द्रविडसोबत शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे, श्रीसंत व इतर खेळाडू दिसत आहेत.
राजस्थानचा यशस्वी कर्णधार ठरला होता
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात सभ्य खेळाडू मानला जाणारा राहुल द्रविड ३ वर्ष राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. २०१३ मध्ये त्याच्याच नेतृत्वात राजस्थानने प्ले ऑफपर्यंत मजल मारली होती. मात्र, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सकडून राजस्थानला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, चॅम्पियन्स लीगमध्ये देखील द्रविडच्या नेतृत्वात राजस्थानने अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर द्रविडने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
अशी राहिली द्रविडची आयपीएल कारकीर्द
राहुल द्रविडने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी २००८ मध्ये कर्णधार म्हणून केली होती. तीन वर्ष तो आरसीबीसाठी खेळला. त्यानंतर, त्याला राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात सामील करून घेतले होते. द्रविडने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ८९ सामने खेळताना २१७४ धावा काढल्या आहेत. त्यामध्ये ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –