टी२० विश्वचषक २०२१ नंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळणार असून राहुल द्रविडनेही या पदासाठी अर्ज केला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविडने मंगळवारी (२६ ऑक्टोबर) अर्ज केला आहे. २०२१ च्या टी२० विश्वचषकानंतर सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे आणि त्यांच्या जागी राहुल द्रविड येणार असल्याचे मानले जात आहे.
आधी राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होण्यास तयार नव्हता. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दीर्घ संभाषणानंतर त्याचे मन वळवले. नुकताच राहुल द्रविड भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. जिथे त्याने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने वनडे मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला होता. मात्र, टी२० मालिका भारतीय संघाला गमवावी लागली होती.
टी२० विश्वचषकानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळायची आहे आणि याच मालिकेपासून राहुल द्रविड संघाची कमान सांभाळू शकतो. मुख्य प्रशिक्षक पदासोबतच त्याला इतरही भूमिका देण्यात येऊ शकतात, अशाही बातम्या येत आहेत. राहुल द्रविडने अनेक वर्षे भारताच्या कनिष्ठ खेळाडूंसाठी काम केले आहे. त्याने १९ वर्षांखालील संघासाठी विश्वचषक जिंकला आहे आणि भारत ‘अ’ संघातील खेळाडूंच्या विकासासाठीही त्याने खूप काम केले आहे. असे मानले जात आहे की, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असतानाही राहुल द्रविड भारत-अ आणि १९ वर्षांखालील संघांवर लक्ष ठेवेल. तो या संघांच्या प्रशिक्षकाचा प्रमुख देखील बनू शकतो.
राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणून किती मानधन राहील?
मुख्य प्रशिक्षकापेक्षा द्रविडची भूमिका मोठी असल्यास, त्याचे मानधनही जास्त राहील. भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बीसीसीआय साडेआठ कोटी रुपये देते, मात्र द्रविडला त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळू शकते. बीसीसीआय द्रविडला १० कोटी रुपये इतके मानधन देऊ शकते.
अजय रात्रा होणार क्षेत्ररक्षण प्रशिक्षक?
भारताचे माजी यष्टिरक्षक अजय रात्रा यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. रात्रा यांनी ६ कसोटी आणि १२ एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त ९९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या या माजी खेळाडूला प्रशिक्षणाचा चांगला अनुभव आहे. ते सध्या आसामचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांनी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबतही काम केले आहे. तसेच यापूर्वी त्यांनी भारतीय महिला संघासोबत देखील काम केले होते.