भारताचा सर्वकालीन महान फलंदाज राहुल द्रविड याचे नाव घेतले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते म्हणजे फलंदाजी करताना भक्कम बचाव. आपल्या अप्रतिम तंत्राने जगभरातील भल्याभल्या फलंदाजांना जेरीस आणणारा द्रविड केवळ भारताचा नाही तर, जागतिक क्रिकेटमधील एक दिग्गज फलंदाज मानला जातो. त्यासोबतच स्लिपमधील एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आणि भारतीय संघाला ज्यावेळी गरज पडली त्यावेळी यष्टीरक्षक म्हणून देखील त्याने जबाबदारी पार पाडली.
भारताला फलंदाजीत अनेक अशक्यप्राय विजय मिळवून देणाऱ्या द्रविडने एकदा चक्क आपल्या गोलंदाजीने भारताला विजय मिळवून दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्याच्या आठवणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
राहुल द्रविड हा सुरुवातीपासून आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जात होता. परंतु द्रविड कारकिर्दीच्या सुरूवातीला काही वर्ष संघासाठी कामचलाऊ गोलंदाज म्हणून देखील भूमिका निभावत असे. द्रविड ऑफस्पिन गोलंदाजी करत असायचा.
दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरुवात
द्रविडने २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलंदाजी करताना भारताला सामन्यात पुनरागमन करून देत विजय मिळवून दिला होता. त्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोची येथे खेळला जात होता. हर्षल गिब्स व गॅरी कस्टर्न यांनी सलामीला २३५ धावांची तगडी भागीदारी केली होती. सुनील जोशी याने गिब्सला १११ धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतर भारताने झटपट बळी मिळवत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.
द्रविडचे दुहेरी यश
भारतीय कर्णधार सौरव गांगुली याने ४३ व्या षटकात चेंडू राहुल द्रविडच्या हाती सोपविला. हा एक जुगार होता. मात्र हात लावेल तिथे सोने करणा-या द्रविडने दुसऱ्याच चेंडूवर शतक काढून खेळत असलेल्या गॅरी कस्टर्नला बाद केले. दक्षिण आफ्रिका या धक्क्यातून सावरत आहे तोपर्यंत अखेरच्या चेंडूवर त्यावेळचा फिनिशर मानला जात असलेल्या लान्स क्लुसनर याला तंबूचा रस्ता दाखवला. दोन प्रमुख फलंदाज एकाच षटकात बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव ३०१ पर्यंत मर्यादित राहिला. भारतीय संघाने हे लक्ष्य दोन चेंडू राखून पार करत मालिकेत विजयी सुरुवात केली होती.
राहुल द्रविडने आपल्या ५०९ सामन्यांच्या दीर्घ कारकीर्दीत केवळ ५१ षटके गोलंदाजी केली. २००० मध्येच त्याने अखेरच्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली होती. त्याने आपल्या कारकीर्दीत ४ बळी मिळवले त्यापैकी दोन याच सामन्यातील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वयाची पस्तीशी ओलांडल्यावर ‘या’ फलंदाजांनी झळकावले पहिले वनडे शतक, गावसकरांचही यादीत नाव
भविष्यातील स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून नावारुपास येत असलेला ‘सॅम करन’
सचिनची मुलगी अन् शुबमनच्या अफेअरची चर्चा सुस्साट; पण त्यामागची कारणं माहितीयेत का? वाचा