भारत दौऱ्यावर असलेला इंग्लंड संघ सध्या भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर १२ मार्चपासून या दोन संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु होत आहे. या टी२० मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची निवड झाली आहे. मात्र या संघात निवड झालेल्या भारतीय खेळाडूंपैकी २ खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरले आहेत.
संघात जागा मिळवण्यासाठी फिटनेस टेस्टमध्ये पास होणे अनिवार्य
मागील काही वर्षापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) खेळोडूंची फिटनेस टेस्ट घेण्यात येते. यात जे खेळाडू उत्तीर्ण होतात, तेच भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी पात्र ठरतात. सध्या बीसीसीआयने फिटनेस टेस्टसाठी नवीन मापदंड तयार केले आहेत.
या नवीन मापदंडांनुसार खेळाडूंना यो-यो टेस्टमध्ये किमान १७.१ गुण मिळवावे लागतात किंवा ८.३ मिनिटात २ किलोमीटर अंतर धावावे लागते.
हे खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये अपयशी
भारतीय संघात इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवड झालेले वरुण चक्रवर्ती आणि राहुल तेवातिया हे खेळाडू बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरले आहेत. असे असले तरी, द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांनाही फिटनेस टेस्ट देण्यासाठी अजून एक संधी दिली जाणार आहे. जर त्यातही ते अपयशी ठरले, तर मात्र त्यांना भारतीय संघातील जागा गमवावी लागू शकते.
राहुल तेवातियाला पहिल्यांदा भारतीय संघात संधी
वरुण आणि तेवातिया यांनी आयपीएल २०२० च्या हंगामात चांगल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर वरुणची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. पण त्याआधीच त्याला दुखापत झाल्याने या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. आता त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात संधी मिळाली आहे. तसेच तेवतियाला मात्र पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्याच्याशिवाय इशान किशन आणि सुर्यकुमार यादवला देखील भारताच्या संघात संधी मिळाली आहे.
आयपीएलमध्ये तेवातिया, वरुणची कामगिरी
आयपीएल २०२०मध्ये तेवातियाने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १४ सामन्यात २५५ धावा केल्या आणि १० विकेट्सही घेतल्या होत्या. तर वरुणने कोलकाता नाईट राईडर्सकडून खेळताना १३ सामन्यांत १७ बळी मिळवले होते.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या –
मॅक्सवेल फॉर्ममध्ये आला रे! एकाच षटकात चोपल्या २८ धावा अन् मोडली खुर्ची, टीकाकारांची बोलती बंद
“क्रिकेटपासून जरा लक्ष दुसरीकडे वळवा, तरच…”, कर्णधार जो रूटचा संघ सहकार्यांना सल्ला
‘या’ शहरात आयोजित व्हावे आयपीएलचे सामने, थेट मुख्यमंत्र्यांचीच बीसीसीआयला विनंती